नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 31 March 2013

वरून कीर्तन...

आपल्या देवाने काय पाप केलंय कोण जाणे.

निदान पंधरवड्यातून एखादा दिवस तरी काढावयास हवा आणि आपल्या वातानुकुलित कचेरीतून बाहेर पडावयास हवे. त्यासाठी फार पैसे खर्च करण्याची किंवा पैसे बाजूला ठेवण्याची वगैरे गरज नसते. फक्त जमिनीवरचे पाय जमिनीवरच ठेवण्याची गरज. आपली जी काही लहानथोर पदवी कचेरीत आहे ती देखील घरी उशीखाली ठेवावी. सोमवारी सकाळी ती टोपी पुन्हा डोक्यावर घालता येते. त्याने होते काय की आपण हे पृथ्वीला पडलेले एक मनोहारी स्वप्न आहे हा भ्रम दूर होऊन, रोज कचेरीत बसून संगणक बडवण्यापेक्षा, आपल्याला मिळालेल्या दोन हातांनी बरेच काही करता येण्यासारखे आहे ह्याची जाणीव होते.

कधीही, कुठेही बाहेर पडले तर माणसांनी स्वत:ला भोवती बसवलेल्या धर्माची चौकट ही सापडतेच सापडते. चर्च, मशीद किंवा मंदिर.
मात्र...एक नक्की...मुसलमान किंवा ख्रिश्चन...दोघांनीही आपापल्या देवांना स्वच्छ घरे बांधून दिली आहेत. मशिदी ? शांत. 'मशिदीच्या आवारात कचरा फेकू नये. तसे करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.' चर्चेस ? देखणे बांधकाम. आवार साफसुधरे. 
देवावर विश्वास ठेवायचा म्हटला, तर ह्या घरांमध्ये त्यांचे देव रहात असतील असे वाटू शकते.

आपल्या देवांची घरे उकिरडे आहेत.
हे सत्य आहे. आपल्या कुठल्यातरी कर्माची शिक्षा देव भोगत आहेत. आज आपण आपला धर्म म्हणून तावातावाने भांडत असतो, कधी जाळपोळ करतो, खूनखराबे होतात. परंतु ज्या देवासाठी आपण हे सगळे इतके करत असतो, त्या देवाला कुठल्या पापाची शिक्षा आपण देत असतो ?

तो देव जाणे आणि त्याचे 'so called' भक्त जाणोत.

आम्ही काही मित्रमंडळी वेळ मिळेल तेव्हा सकाळी घर सोडतो. व आपल्या कॅमेऱ्यातून जे नजरेसमोर येईल ते व त्यामागे समाजाची भावना दिसून येते ते...टिपत असतो.

आज बाणगंगा.
इतकी वर्षे मुंबईत राहून देखील इथे जाणे झाले नव्हते.

अदमासे दहाच्या सुमारास आम्ही तेथे पोचलो. डाव्या हाताला काही श्राद्धे चालू होती. समोर हिरव्या तलावात करडी पांढरी बदके पोहत होती. तरुण, लहान मुले बदकांना खाद्यपदार्थ भरवित होते. उजव्या हाताला एक पन्नाशीच्या आसपासचा पुरुष खराटा हातात घेऊन मन लावून पायऱ्या झाडत होता. बाकी ? गलिच्छ. तलावाच्या काठाकाठाने प्लास्टीकच्या पाण्याच्या शीतपेयांच्या बाटल्या, बिस्किटांची वेष्टणे...हे आणि ते. तलावाच्या पाण्यात ज्या वस्तूंचे स्थानच नाही अशा असंख्य वस्तू. हे कोणाच्याही नजरेस का खटकत नाही ? ह्यावर कोणी काहीच करू का इच्छित नाही ? इथे 'हे सगळं फक्त मलाच दिसतं आणि मीच फक्त ह्यावर काही करू शकते, वा मीच करू इच्छिते असा माज मला अजून तरी आलेला नाही. हळूहळू तोही येईल बहुदा.

"काका हे काम तुम्ही रोज करता ?"
"हो तर. रोज करतो."
"तुम्हाला पगार मिळतो ?"
"हो. बाराशे रुपये मिळतात. ट्रस्ट देतो."
"पण इथे येणारी लोकं हा कचरा करूच कशी शकतात ?"  हे असे मुर्खासारखे प्रश्न विचारण्याची माझी खोड जित्याची आहे. त्यामुळे मी मेल्याशिवाय ती जायची नाही.
"काय करणार त्याला ? हे लोकांनी समजून घ्यायला नको ?"
"मला द्या एक झाडू ! मी पण काढते तुमच्याबरोबर कचरा. ह्या इथल्या दहा देवळांत जाऊन मुर्खासारखा नमस्कार ठोकण्यात मी माझा वेळ आणि शक्ती अजिबात फुकट घालवू शकत नाही ! त्यापेक्षा मी हे तळ थोडं साफ केलं ना तर माझा केविलवाणा देव थोडा तरी उठून बसू शकेल !"
मी झाडू मारायला घेतली. कचरा उचलायला सुरवात केली.
माझी मित्रमंडळी देखील कामाला लागली.

"तुला हे काम केल्याने पुण्य मिळेल."
मी वळून बघितले.
वरच्या पायरीवर काही लोकं चालली होती. त्यातले भटजी मला आशीर्वाद देत होते. माझ्या डोळ्यांना त्यांच्या हातात काही सामान दिसले.
"आणि तुम्ही इथे कचरा करता तेव्हा तुम्हाला पापच लागेल."
अगदी मुख्यमंत्री देखील मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू शकत नाहीत.

मी हे काम केलं हा माझा मोठेपणा सांगायला इथे टंकित करत बसले नाहीये. फक्त तुमचे सगळे देव...तुम्ही मानत असलेले तुमचे सगळे देव...सध्या मानवनिर्मित उकिरड्यात रहातात. आणि जे देव तुम्हाला परके वा उपरे वाटतात ते अगदी शांत आणि स्वच्छ घरात वसन करतात.
हे फक्त सांगायचा पुन्हा एक प्रयत्न करते आहे.

परवा आम्ही कान्हेरी गुंफा पहाण्यासाठी गेलो होतो. तळाशी एक छोटेखानी हॉटेल होतो. घरातून लवकर बाहेर पडलो होतो. त्यामुळे चहा न्याहारी वगैरे न करताच निघालो होतो. मस्त कांदे पोह्यांच्या फोडणीचा वास येत होतो. टेबलावर आम्ही जागा पकडून बसलो. बाजूच्याच झाडावर वानरे देखील बसली. म्हटलं चहाबरोबर ग्लुकोजची बिस्किटे खावीत. तिथल्या मुलाकडे मागितली. त्याने अख्खा पुडा आमच्या हातात देण्यास सपशेल नकार दिला.
"नाही. पुडा नाही देऊ शकत तुम्हाला. हवी तितकी बिस्कीटं देतो. सांगा किती हवीत."
"का रे बाबा ?" आम्ही त्याला विचारलं.
"आमच्यावर बंदी आहे. लोकं वेष्टन कुठेही टाकतात."
झक्कास. मला एकदम भरून आलं. गणपती विसर्जनाच्या वेळची गिरगाव चौपाटी आठवली. पारले जीची अगणित वेष्टने उचलली होती आम्ही. कारण तिथे मुळातच लोकांना प्लास्टीकच्या कपात चहा आणि पारले बिस्किटे भरभरून दिली जात होती.
पाप धुण्यास गणपती होताच.

घ्यायचं तर मनावर घ्या.
नाहीतर सोडून द्या.
'स्वच्छतेमध्ये देव आहे' असे आमचे बालमोहनचे मुख्याध्यापक आम्हाला शिकवीत असत.
आणि ते मनावर कायमचं कोरलं गेलं आहे.
तुम्हाला तुमच्या शाळेत काय शिकवलंय हे त्या तुमच्या देवास ठाऊक.

अस्वच्छतेचा उबग आल्याने देवांनी कधी धर्मांतर केले तर त्यात काही वावगे वाटू नये.

काही सांगता येत नाही...आता आमच्या देवाची मंदिरे घाण आणि उकिरडा म्हणून दुसऱ्यांची भक्तिस्थळे घाण करण्यास लोकं कमी करणार नाहीत.

एकदा कुत्र्यासारखी रस्त्यावर XXXची सवय लागल्यावर मग काहीही फरक पडत नाही.
जिथे आहोत तो संडास.

बहुतेक तुम्ही आता म्हणाल...तू घरातच बस...कुठेही बाहेर पडू नकोस.















छायाचित्रे दीपककडून साभार...

Friday 29 March 2013

मालनगाथा

रोजच्या वाचनात एक तरी पुस्तक हे असायलाच हवं. अलिखित नियम. हातातल्या पुस्तकाचं शेवटचं पान उलटलं की लगेच पुस्तकांचं छोटेखानी लाकडी कपाट उघडावं आणि असंख्य न वाचलेल्या पुस्तकांना वरखाली करावं. पुस्तकं पण लबाड असतात. आळशी असतात. त्यांच्या मनात जेव्हा बाहेर उन्हात चार दिवस, अंग पसरून बसावंसं वाटतं तेव्हाच ती आपल्या हाताला लागतात. नाहीतर अंधारात गपगुमान डोळे मिटून, एक जागा पकडून, निवांत बसून असतात ! काल एका पुस्तकाने अगदी आळस झटकून नाही पण डोळे किलकिले करून माझ्याकडे बघितलं. मी त्याला कपाटाबाहेर काढलं. मुखपृष्ठावर सुंदरसं चित्र. आनंददायी रंगांतलं. मालनगाथा. इंदिरा संत. मी मुखपृष्ठ उलटलं आणि आत...
फोटो आहेत खाली जोडलेले...ते बघा म्हणजे जसा मला आश्चर्याचा धक्का बसला तसाच तुम्हाला पण बसेल !




मी मराठी शब्दकोश उघडला. मालन म्हणजे अतिशय सुंदर स्त्री. आणि गाथा ह्या शब्दाचा अर्थ, कविता, प्राकृत, छंद-रहित रचना, साधे गद्य. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये विद्वानांची नावे आहेत...रमेश तेंडुलकर, सौ. वासंती मुझुमदार, दुर्गा भागवत...प्रस्तावना वाचता वाचता मला खूप वर्षांपूर्वी बाबांच्या घरी रंगणाऱ्या चर्चा आठवल्या. आणि अगदी फारच मोठा खजिना हाताशी लागल्यासारखं वाटू लागलं. नक्कीच हे पुस्तक दुर्गाआजींनी बाबांना आणून दिलं असावं. आणि मग ते आमच्याकडे राहून गेलं असावं. आणि आज माझ्या हातात पडण्यासाठी ह्या पुस्तकाने डोकं वर काढलं असावं.

पुस्तकाबद्दल मी काही बालिश बोलण्यापेक्षा इंदिरा संतांचेच काही परिच्छेद मी इथे टंकित करणे उचित.

'नवे वर्ष सुरू झाले आणि मनात आले, आणखी आठ वर्षांनी हे विसावे शतक मावळणार. त्याबरोबर आणखी कोणत्या गोष्टी मावळातील ? हा मनाचा खेळ सुरू झाला आणि त्यात ही मावळतीच्या धारेला लागलेली बकुळेची फुले हातांशी आली. आजवर कोट्यावधी सुर्योदयांनी ती उमललेली पाहिली.
यातीलच एक पहाट. एका डोंगरदरीत विसावलेले एक खेडेगाव. सर्व घरे साखरझोपेत असलेली. पण घरातील ओसरीशी वा पडवीशी एक ठाणवई मिणीमिणी उजळत असलेली. त्या प्रकाशात जात्याशी बसलेली एक मालन. एक मांडी घालून, एक पाय लांब सोडलेला. तिचा काकणांनी भरलेला हात जात्याचा खुंटा धरून जाते फिरवीत असलेला, दुसरा हात मधूनमधून बाजूच्या सुपातील जोंधळे मुठीने घेऊन जात्याला भरवीत असलेला.
जात्याचा तो मंद सुरातील घर्रघर्र असा वळणे घेणारा आवाज. दळतानाच्या हालचालींची मालनीची वळणदार लय आणि यात एकरूप झालेली ती मालन. जसे पीठ जात्यातून झरत जाते, तशा तिच्या ओठांतून शब्दकळ्या उमलू लागतात. ओव्यामागून ओव्या गात असता दळण कधी संपते, तिला कळत नाही. त्या ओव्याही ओळीला ओळ जोडून, घोळून घोळून, उंच स्वरात गायच्या. ओवीच्या शेवटच्या ओळीच्या अखेरीस एक लांब हेल देऊन त्याच्या टोकानेच दुसरी ओवी उचलायची.
या ओवीत काय नसायचे ? अवघ्या स्त्रीजीवनाला त्यांनी स्पर्श केलेला असायचा. सुपली - कुरुकुळीच्या खेळापासून, घाण्याच्या बैलासारख्या ओढलेल्या कष्टांपर्यंत. शृंगाररसापासून ईश्वराशी जडलेल्या सौहार्दरसापर्यंत. पुत्रजन्मापासून वैधव्याच्या आकांतापर्यंत, जे जे म्हणून स्त्रीला भावले, ते सर्व या ओवीत आहे. ते एक अमृतानुभवाचे अथांग असे मानससरोवर आहे. अशा या मानससरोवराचा एकविसाव्या शतकात मागमूसही रहाणार नाही. कारण आता जातेसंस्कृती संपली आहे.'

'ओव्यांच्या नादात दळण संपल्याची जाणीव होत नाही. सुपात दोन ओंजळी दाणे राहिले, की 'दळण सरलं ' हे लक्षात येते. सरले आणि संपले या दोन शब्दांत सूक्ष्म फरक आहे. असेही मालन म्हणते. 'सरलं' हा अर्धविराम असतो, तर संपलं हा पूर्णविराम असतो. दळण ही एक संसारातील नित्य चालू राहणारी क्रिया आहे. म्हणून 'दळण संपलं' असं म्हणायचं नाही.'

'जात्यावर गायल्या जाणाऱ्या ओव्या. अवघ्या संसाराचे एक उपनिषद. जाते-संस्कृतीने मालनीच्या पदरात बांधलेले हे स्त्रीधन म्हणजे स्त्रियांच्या काव्याचा मुळारंभ आरंभ !'

'बोलीभाषा हीच त्यांच्या अनुभवाची भाषा असते. तिचा अनुभव आणि तिची शब्दकला यांचे ते एक मधुर रसायन असते. त्यांच्या ओवीतील शब्दकला बदलली - एका शब्दाने बदलली, तरी त्या ओवीचा तोल जातो. 'पंढsगरीशी जाऊ' हे 'पंढरीशी जाऊ' असे बदलले, की संपलेच. 'भरतार' चे 'भ्रतार' केले, की त्या ओळीत त्राण राहत नाही. एवढी त्या ओळीची वा बोलीभाषेची नाजूक अशी संवेदनशीलता आहे. नागरी भाषेप्रमाणे तिची साहित्यिक भाषा होण्याची मुळी महत्त्वाकांक्षाच नसते. ती व्याकरणाने नियत नसते. ओवीच्या भावानुभवाच्या झोक्याप्रमाणे, लयीप्रमाणे हेलावणारे असे तिचे रूप असते. नियम-विरहित असे ते बोलीभाषेचे जिवंत वळण असते.'

खरं लिहायला गेलं तर प्रत्येक ओळ लिहिण्यासारखी...आणि तुम्हाला वाचून दाखवण्यासारखी. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमधून त्या ओव्या मिळवायच्या, त्या संकलीत करावयाच्या आणि त्यातील काही ओव्या वेचून त्यावर इंदिरा संतांनी आपल्या भावून भाषेत रसग्रहण करावे...ह्यासारखा अजून दुसरा खजिना काय असावा ? किती सहजत्या ह्या स्त्रिया आपलं सुखदु:ख मांडून जातात...ते ओवीत रचतात...आणि त्यावर हलकी वळणे घेत गोड स्वरात गातात. माझ्या अंगावर काटा येतो...घशात आवंढा येतो...आणि मी देखील त्यातल्याच कोणा मालिनीच्या समोर मांडी घालून बसते...झुंजूमुंजू झालेले असते, तिच्या जात्याचा खांब मीही पकडते....आता मालिनी तिच्या ओवीत आर्तता आणते....जणू मी माझ्या मनीची वेदना गेल्या रात्रीच तिला सांगून बसले.

'पुढील गाथेत एक मालन आपल्या घरासंसाराबद्दल, पतीबद्दल ओव्या गात आहे. घर कसे थोरांचे. येणाऱ्या जाणाऱ्याचे. पै-पाहुण्यांचे. घराच्या लहान-थोर कुटुंबाचे ! या घराची प्रमुख तीच आहे. 'धनीयाचे जाते' हे शब्द हे सूचित करतात. हे दळण तिचे आनंदाचे काम आहे. दळायचे, त्याचे जेवण करायचे, लहानथोरांना वाढायचे. त्यातच भाऊ पाहुणा आला, तर रवापिठी दळायची, या सगळ्या उस्तवारीत तिला आनंद वाटतो. पहाटेच उठलेला तिचा लहानाही तिच्या मांडीवर झोपला आहे. याचाही तिला आनंद वाटतो. घरात नवराही उठला आहे. तिने तापवलेल्या पाण्याने अंघोळ करून, गंध-टिळा करून तिच्या मागे तिचे कौतुक पाहत तो उभा आहे.
ती तर गीताच्या छंदात इतकी गुंतली आहे, की तिला वाटते विठ्ठलच अभीर-गंधात मिसळतो आहे. तिचे दळणाचे पीठ इतके बारीक गंधासारखे आहे, की तेच गंध म्हणून विठ्ठलाने घेतले आहे ! आणि आता मी जात्याच्या फेराबरोबर ओव्या गाते आहे. तर तो गिरिधारी उभा आहे. 'गीताच्या छंदामंदी' तिला झालेले हे भास !
ही गाथा म्हणजे चित्रकाराला दिलेले आव्हानच आहे आणि रसिकालाही अशा या आपल्याच छंदात गुंग असणाऱ्या मालनीचे दळण थांबलेच; पण ओव्या मात्र लाखावर उरल्या - या कधीच संपत नाहीत. 
अशी ही गाथा :

दळन दळीतेs                 बाई चुड्याच्या हातायानं
भागीवान माझ्याs          त्या गs कंठाच्या जात्यायानं
दळन दळीतेs                 मोती सुपातs जवाsरss
माझी गs जेवणारीs       थोराघाराची लहानथोरss
दळनs दळीतेs               रावापीठी ग गव्हाचीss
जेवणाला जोडीs            बाई येनार भावाचीss
दळन दळीतेs                 बाई दळीता आनंदss
माझ्या गs मांडीवरs       बाई झोपला गोइंदss
दळन दळीतेs                 गीताच्या छंदामंदीs
इठूदेव ल्यालंs                बाई अबीर गंधामंदी
वाव्या मी गायील्याs      जात्याच्या फेरावरss
सरलं दळनs                  वव्या उरल्या लाखावरss
वव्या मी गsगातेs          जात्याच्या चवफेरीss
जातं  गs वडीतानाss     उभं हायीती गीरीधारीss


एखादं सुरेल गाणं...वा मंद बासरीचे सूर कानी पडतात....आणि त्यानंतर कुठलाही आवाज नकोसा वाटतो.

Thursday 28 March 2013

अशीही हसवाहसवी...

माझी गाडी रस्त्यावर रहाते. तो माझा नाईलाज आहे. आपल्या वस्तूंवर आपण प्रेम करणे हे काही अवास्तवी नसावे. मी ज्या घरात रहाते ते घर स्वच्छ ठेवणे ही माझी गरज आहे. व ते काम आमची रेश्मा करते. रस्ता साफ करणे ह्यासाठी महानगरपालिकेने माणसे नेमली आहेत. परंतु, ती कधी कामावर येतात तर कधी नाही. आपल्याला नेहेमीच मनपसंत काम उदरभरणासाठी मिळेल ह्याची काही शाश्वती नसते आणि रस्त्यावरचा केर काढणे कोणाला आवडू शकेल हे एकूणच कठीण दिसते.

मला केर काढणे आवडते. केर काढणे, वा एखादी गोष्ट धूळ झटकून पुन्हा जागेवर ठेवणे ह्यातील आनंद काही आगळाच. त्या मागचे कारण इतकेच असावे की काम चांगले झाले आहे, त्याने काही आसपास फरक पडला आहे ह्याची प्रचिती त्वरित मिळते. असे काही सर्वच कामांबद्दल बोलता येत नाही. असंख्य कामे अशी असतात जी सातत्याने करावी लागतात तेव्हा कुठे त्याचे बरे निकाल आपल्या डोळ्यांना दिसू लागतात.

कोण जाणे केर काढावयास मी कधी शिकले. माझे बाबा अतिशय सुंदर कचरा काढीत असत. त्यांनीच कधीतरी ते काम मला सांगितले असावे. माझा कचरा काढून झाल्यावर बाबा घरभर अनवाणी पायाने चालीत, व पाय जमिनीवर घासून मी अंगावर घेतलेले काम बरे केले आहे की नाही ते तपासीत. जर त्यांच्या पसंतीस ते उतरले तर त्याबद्दल मला शाबासकी मिळे. त्या शाबासकीसाठी मला आपण रोजच कचरा काढावा अशी इच्छा होत असे. "अनघा, छान काढलास हं कचरा !" बाबांच्या तोंडून हे उद्गार ऐकणे म्हणजे भारीच.

माझी गाडी रस्त्यावर लागत असल्याकारणाने तिच्या आसपासचा कचरा काढला जात नाही. दिवसरात्र माझ्या मुक्या गाडीला अंगाखाली कचरा घेऊन तिष्ठत उभे रहावे लागते. उन्हापावसात. ऊन आणि पाऊस ह्या दोन गोष्टींवर मी काहीही करू शकत नाही. आपण काय करू शकतो व कोणत्या गोष्टीवर आपला ताबा नाही हे सर्वप्रथम समजून घेतलेले बरे असते. मी धडधाकट जन्माला आले आहे, आणि अजूनही माझ्या अंगात शक्ती आहे, हे मी स्वत:ला वा जगाला सिद्ध करावयाचेच म्हटले तर ते एखाद्या चांगल्या गोष्टीने करावे. मी बदल घडवून आणू शकते इतका आत्मविश्वास मात्र माझ्यात आहेच. आणि, कुठलाही बदल घडवून आणावयाचा असेल तर त्याची सुरवात स्वत:पासूनच व्हावयास हवी हे नक्की. नाहीतर मी आणि एखाद्या कुत्र्याने रस्त्यात करून ठेवलेली घाण ह्यात फरक तो कोणता ?
उगा भुईला भार.

पहाटे शिवाजी पार्कला चकरा मारीत असताना माझ्या लक्षात आले, की आपण आपल्या गाडीवर हा असा अन्याय नाही करू शकत. केवळ तिला मी घरात ठेऊ शकत नाही म्हणून तिला कचऱ्यात उभे करून ठेवणे हे सपशेल चुकीचे आहे. आता मी दुसऱ्यावर नेमके किती विसंबून रहावयाचे आहे ? एखाद दिवस रेश्मा आली नाही तर मी घर असेच गलिच्छ टाकून कामावर जाते काय ? नाही. मी केर काढूनच हसतेखेळते घर सोडते. ह्याचाच अर्थ असा होतो की ह्यावर देखील मला काहीतरी केलेच पाहिजे.

घरी पोचले. गाडी रस्त्यावर लावली. आणि आमचे रखवालदार गोसावी ह्यांना विचारले," गोसावी, तुमच्याकडे झाडू आहे ?"
"झाडू ? झाडू कशाला हवीय तुम्हाला ?"
"द्या तर !"
गोसावी इमारतीच्या मागे धावतपळत गेले आणि येताना एक खराटा घेऊन आले.
झक्कास !
मी खराटा घेतला आणि माझ्या गाडीच्या आसपासचा आणि तिच्या अंगाखालचा रस्ता झाडावयास सुरुवात केली.
खर्र खर्र.
मी पार आमच्या गावच्या अंगणात जाऊन पोहोचले. पहाटे जाग यायची तीच मुळी कोणी अंगण झाडीत असे त्या नादाने. खर्र खर्र. डोळे चोळत अंगणात उभे रहावे तर अंगण अगदी कोणी गुदगुल्या करीत असल्यागत खुदखुदत असे. खुशीत.

मोजून पाच मिनिटे लागली माझ्या गाडीला हसवायला.
रस्ता हसला. गाडी हसली. मी हसले. आणि वर आले तर भिंतीवरील व्यक्तिचित्रातील बाबा पण हसले.
"अनघा, छान काढलास हं कचरा."

आहे काय आणि नाही काय ?!

Saturday 23 March 2013

आठव...

...आठवांचे ओझे,
आठवांचे व्रणं.
आठवांची फुलपाखरे,
देती पोलादी बळ.

Friday 22 March 2013

हट्ट

जिवंत असलेला माणूस आपली बाजू मांडू शकतो, मेलेला माणूस कुठून आणि कशी मांडणार ? स्वप्नातबिप्नात येऊन सांगून गेला तरी ते शेवटी एक स्वप्नच रहातं. त्यावर सर्वचजण विश्वास ठेवतील असे काही नाही.

हा विचार डोक्यात घेतला की बऱ्याच, किंबहुना बहुतांशी गोष्टी सांगितल्या जात नाहीत. आत दाबून ठेवल्या जातात. परंतु, आज तो धोका पत्करून मी लिहिणार आहे कारण त्यातून कोणाच्या विचाराला, सुबुद्धीला चालना मिळाली तर कुठेतरी, कोणाचे तरी भलेच होईल.

अलंकारिक भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला तरीही ते आज कठीणच आहे.
रोखठोक. घटना जशा घडल्या तश्या.
त्यावर विशेष टिपणी न करता.

स्त्रीहट्ट, बालहट्ट आणि राजहट्ट ह्यावर शहाणा देखील काही करू शकत नाही म्हणतात. हट्ट म्हटले की त्या गोष्टीला आपोआपच एक नकारार्थी वलय प्राप्त होतं. आणि मग तो हट्ट नक्की कशासाठी केला गेला आहे त्याचा विसरच पडतो. म्हणजे एखाद्या बाबीचा हट्ट धरून त्यासाठी उपोषण केले तर मात्र ते चांगलेच. परंतु, घरात एखाद्या गोष्टीसाठी हट्ट  करणे, त्यासाठी अबोला, उपोषण हे मार्ग पत्करले तरीही ते ऐकलेच जातील असे नाही.

स्त्री हीच शेवटी स्त्रीची शत्रू असते.
"अनघाच्या हट्टी स्वभावामुळे शरदने दारू सोडली नाही" हे विधान शरद मरून गेल्यावर काही दिवसानंतर मी ऐकले. एका स्त्रीकडूनच.

आता "तू दारू सोड" हा हट्ट मी नक्की कधी, किती वेळा आणि काय प्रकारे केला हे आपण बघू. ती स्त्री काही हे वाचायला जाणार नाही आणि शरद आज हयात नसल्याने तो त्याची भूमिका मांडू शकत नाही. त्यामुळे रहाता राहिले मी...जी हे लिहित आहे. त्यामुळे जे काही बोलायचं आहे, किंवा तुम्हाला ह्यातील कोणताही मुद्दा पटला नाही तर तो तुम्हाला माझ्यासमोरच मांडणे भाग आहे. कोणी काही करू शकत नाही त्यावर.

हट्ट प्रसंग १.
माझे वय वर्षे सोळा. शरद अठरा. स्थळ: जे जे स्कूल ऑफ अप्लाईड आर्टचा परिसर.
"तू नको ना पिऊस दारू. नाही ती बरी. आणि मला नाही आवडत."
"सोडणार मी."

हट्ट प्रसंग २.
माझे वय तेवीस. त्याचे पंचवीस.
गणपतीचे दिवस. शरदाच्या जीवश्चकंठश्च्य मित्राकडे गणपती. स्थळ: त्यांचे घर. रात्रीचे आठ. आरती सुरू. शरद थोडा उशिरा हजर. दारू पिऊन तर्र. आरतीसाठी उभा.
रात्री उशिरा आम्ही आमच्या घरी परत.
"हे का केलंस तू ? दारू पिऊन आरती करत होतास !" मी. रडत. हुंदके वगैरे.
"रडू नको. सोडणार मी दारू." शरद.

हट्ट प्रसंग ३.
माझे वय सत्तावीस अठ्ठावीस. गणित मांडले तर शरद तीस. लग्न झालेले आहे. स्थळ: बाबांचे घर. जाहिरातक्षेत्रातील झगमगीत बक्षीस समारंभ. शरद दारू पिणार हे नक्की.
"प्लीज प्लीज आज तू नको पिऊस. आज आपण बाबांच्या घरी आहोत. बाबांच्या घरी दारू पिऊन तू नको येऊस. असं कोणी उभं पण रहात नाही बाबांसमोर दारू पिऊन."
रात्रीचे २. बेल वाजली. दार उघडले. दारुचा वास. दारात शरद उभा.

हट्ट प्रसंग ४.
माझे वय पस्तीसच्या आसपास. आमची लेक सात आठ.
स्थळ: शरदच्या मानलेल्या बहिणीचे घर. तिचा नवरा आणि शरद ह्यांच्या गप्पा रंगात. समोर दारूचे ग्लास. शरदचा रिकामा ग्लास बहिणीचा नवरा भरत असताना माझी लेक त्यांना म्हणाली," काका नका ना बाबाला दारू देऊ !"
काका," काही नाही होत बाळा."
दोन तासांनी आम्ही तिथून निघालो तेव्हा शरद दारू पिऊन तर्र. त्याला आम्ही मायलेकींनी मिळून गाडीत घातले. आणि घरी पोचलो.
हा झाला बालहट्ट.
हट्ट सोन्याचे ना कपडालत्त्याचे. दारू सोड हा हट्ट मी प्रेमात पडल्यापासून केला. आणि त्यावेळी...हो, सोडणार आहे...हो, लग्न झाल्यावर सोडणार आहे....हो, मूल झाल्यावर सोडणार आहे...हो, ती मोठी झाल्यावर सोडणार आहे....हेच ऐकायला मिळालेलं आहे.

बरोबर. त्याने मला सुरवातीपासून वचन दिलं. जेव्हा जमेल तेव्हा मी हे एकच मागितलं. आणि तो माझा हट्ट त्याच्यासाठी न पुरवता येण्यासारखा होता. बाकी मी काहीही मागितले असते तरी ते त्याने माझ्यासमोर उभे केले असते. अमेरिका ट्रिप ? हे घे तिकीट ?
सोनं ? ह्या घे जाडजूड बांगड्या.
शालू ? हा पहा भरजरी शालू !
पण मी एकच हट्ट धरून बसले.
"तू मला सांगितलं होतंस...दारू सोडशील म्हणून. मला नाही सहन होत हा वास."
"त्याला काही नाही करू शकत. तो तुला सहन करायलाच हवा."

कृतीतून त्याने पूर्ण करून दाखवलेला त्याचा हट्ट.
हट्टी शरद.
हट्टी मी.
"अनघाच्या हट्टी स्वभावामुळे शरदने दारू सोडली नाही."
तीच ती शरदाची बहिण, जिचा नवरा माझ्या चिमुकल्या लेकीचे देखील न मानता शरदच्या ग्लासात दारू ओतत होता.

दोन हट्टी माणसं एकत्र आली होती असं म्हणता येईल.
शरद, दिलेले वाचन पाळणारा राम नव्हता.
मी सीता होणे, असणे हा आपल्या समाजाचा कायम हट्ट असतो.
हट्टी यमराजाला झुकवणे सोप्पे असेल परंतु, हट्टी नवऱ्याला एखादी चांगली मागणी पुरी करण्यास भाग पाडणे मला जमले नाही. त्यामुळे मी सावित्री देखील नव्हते.
वाल्याच्या पापामध्ये सहभागी मित्रमंडळी होती.
जेव्हा पार्ट्या होत, शरद सगळ्यांची जाडजूड बिलं भरून, पिऊन घरी परते, त्यावेळी त्या घरी आम्ही दोघी होतो.
कधी त्याची वाट बघून झोपून गेलेली त्याची लेक. वा रात्रीबेरात्री गरमागरम जेवण वाढणारी मी.
परिस्थितीमुळे नवरा जिवंत असताना गळ्यातलं मंगळसूत्र विकायला काढणारी मी.
कलियुगातील अनघा.


Friday 15 March 2013

फाईल

म्हटलं तर गोष्ट साधीच आहे, परंतु बऱ्याचदा साध्याच गोष्टी आपल्याला बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. आपण त्या समजून घेऊ शकू की नाही ही बाब अलाहिदा.

एखादी व्यक्ती जन्माला येते त्यावेळी ती रक्ताची नाती आपल्याबरोबर घेऊन जन्माला येते. आणि पुढील आयुष्यात स्वकर्तृत्वावर, नवनवीन नाती जोडत जाते. ही नवीन नाती तो आपल्या आवडीनिवडीनुसार, स्वभावानुसार, स्वार्थाकरीता विणत असतो. मूळ व्यक्ती जरी एक असली तरीही तिच्या स्वभावाला असंख्य कांगोरे असतात. त्यामुळे एखादा माणूस हा असाच वागेल असे काही सांगता येत नाही. उदाहरणार्थ, ती व्यक्ती हा जर पुरुष धरला तर आपल्या आईवडिलांसमवेत एक ढंग, बहिणभावासमवेत एक ढंग व मित्रमैत्रिणीसमवेत एक ढंग असे होऊ शकते. कारण त्यांचे संदर्भच वेगळे असतात.

हे झाले वरवरचे.
खोल विहिरीचा तळ काही वेगळाच असतो.

विषय क्लिष्ट आहे.

त्याचे असे झाले...

कधीही माझ्या नवऱ्याचा विषय त्याच्या एखाद्या मित्रासमोर निघाला, की एकूणच त्यांना प्रेमाचे भरते येते, डोळ्यात अश्रू जमा होतात, वगैरे वगैरे. त्याच्याबद्दलच्या आठवणी त्यांच्या मनात अगदी कोलाहल माजवतात.
माझ्या मनात तर तो कायम असतो. सतत. परंतु, हे असे अश्रू, आणि 'किती तो चांगला होता...'इत्यादी इत्यादी माझ्या मनात अजिबात येत नाही. 
एकदा मी आणि माझी लेक असेच काही बोलत बसलो होतो. मी तिला म्हटले, "चल, पटकन एखादी बाबाची आठवण सांग पाहू. पटकन हं. म्हणजे अगदी मनावर तरंगत असलेली आठवण आपण पकडायची. उगाच गळ टाकून बसायचे नाही !"
असे म्हटले असता, माझ्या नवऱ्याच्या नशिबाने तिच्या मनाने तिच्या डोक्याला एक छानशी गोड आठवण पुरवली.
मग आता माझी पाळी.
वर तरंगणारे कमळ नासके होते.

पतीपत्नीमधील असे असंख्य प्रसंग असू शकतात, जे फक्त त्यांचे आहेत. त्यातील जखमा फक्त त्यांच्यासाठीच्या आहेत. त्यातील दु:खे ही त्यांचीच आहेत. ती दु:खे, त्या जखमा कितीही कोणापुढे अगदी ती विहीर उपडी करून दाखवली, तरीही त्यातील खोली ही कधीही पोचता न येण्यासारखीच रहाते. त्यामुळे त्यातील एक माणूस निधन पावला तर जिवंत माणसाने आता फक्त गुणगान गायला हवे असे का बरे असावे ?
हे म्हणजे आपले राजकीय नेते मरता क्षणी लगेच सगळेजण अकस्मात गुणगान गावू लागतात, तसे झाले. 

ठळक जाड अक्षरांत लिहिलेला अधोरेखित नियम 'गेलेल्या माणसाबद्दल आपण चांगलेच बोलावयास हवे' असा आहे.

नाती बदलतात. आणि गणितं बदलतात. उद्या माझ्या आईला माझ्या वडिलांबद्दल काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी असण्याचा तिचा हक्क मी नाकारू शकत नाही. "हे असं कसं बोलतेस तू ? माझे वडील तर फारच ग्रेट होते !" हे असं जर मी तिला बोलले तर ते भावनाशुन्य होईल. बाबांचे आणि तिचे नाते हे पतीपत्नीचे होते. आणि माझे आणि त्यांचे नाते हे लेक व वडील ह्यांचे होते. म्हणजे सगळेच नियम बदलले. इतकेच कशाला, मी माझ्या वडिलांची थोरली लेक आहे. त्यामुळे माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना, व माझ्यानंतर सहा वर्षांनी जन्माला आलेल्या माझ्या बहिणीच्या भावना ह्यात कितीतरी तफावत आहे. कारण पुन्हा सर्व गणिते बदलतात.

फारा वर्षांपूर्वी बाबा एकदा आईविषयी काही अप्रिय आठवणी मला सांगू पहात होते. त्यांना फक्त एक कान हवा होता. कुठलेही हृदय नको होते. परंतु, मी त्या परीक्षेत पास नाही होऊ शकले. ती माझी आई आहे, तेव्हा तुम्ही मला हे काही सांगू नका, असे मी सांगून टाकले. आणि आजपर्यंत कधीही कोणाशीही आतले मनातले न बोलणारे बाबा गप्प झाले. म्हणजे मी माझ्या कानात नात्याचे बोळे घातले.

आजवर मी स्वत:ला ह्या माझ्या गुन्ह्यासाठी माफ नाही करू शकले.

काल मी नवऱ्याच्या जिवलग मित्राशी बोलत होते. कधीकधी नको ते विषय वर येतात. आणि काही बोलायला भाग पाडतात. त्याने मग मला नियम ऐकवला. "गेलेल्या माणसाबद्दल आपण चांगलेच बोलायला हवे."
मी ज्यावेळी माझ्या आईवडिलांचे उदाहरण दिले...आईला माझ्या वडिलांबद्दल तक्रारी असू शकतात, व त्या मुलींसमोर बोलण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे. आता त्याला माझा विचार पटू लागला. परंतु, तरीही मला परवानगी नव्हतीच. गत नवऱ्याची एक तक्रार आणि माझ्यासमोर नियमाचा राक्षस उभा ठाकतो.

'गेलेल्या माणसाबद्दल चांगलेच लक्षात ठेवायला हवे. त्याच्याविषयी चांगलेच बोलावयास हवे.'

परवा टीव्हीवर कुठल्याश्या प्रदेशावर डॉक्युमेंटरी चालू होती. तेथील जंगलातील झाडे ठराविक ऋतूमध्ये रंगीबेरंगी फुलपाखरांनी डवरलेली असतात. एकाच रंगाची, एकाच आकाराची असंख्य फुलपाखरे. झाड आत लपून बसलेले. त्यावरील फुलापाखरांमुळे आपल्याला झाडाचा आकार दिसतो, आणि त्याच्या आतील अस्तित्वाची जाणीव होते. हे असे आयुष्य असावे. नाजूक, हलक्या तरल आठवांनी डवरलेले. वाऱ्याच्या हलक्या झुळूकीने नाजूक पंख फडफडावे, भवतालच्या प्रदेशाला एक सुख देऊन जावे.

झाड किडीने पोखरलेले असू नये. आत. खोल.
झाडाच्या ह्या अवस्थेचा जगाला मागमूस लागू नये.
आणि एक दिवस अकस्मात झाड उन्मळून पडावे.

पोलिसस्टेशन मधील कारभारासारखे चालावयास हवे.
माणूस मेला ?
फाईल बंद !

मनाला न पटणारा नियम जर कोणी माथी थोपला तर मन सत्याग्रह करते.
खोल खोल आत गाढलेली भुतं उसळी घेतात.

Thursday 14 March 2013

देवावर विश्वास ?

"तुझा देवावर विश्वास आहे ? आश्चर्यच वाटतंय मला !"
माझी मैत्रीण मला जेव्हा असं म्हणाली तेव्हा मी थोडी विचारात पडले.

माझ्या बाबांचा देवावर विश्वास होता का ? होता. परंतु, आपला देवावर विश्वास आहे ह्याचा पुरावा उभा करण्यासाठी वा इतर कुठल्याही कारणासाठी ते कुठल्या देवळात गेले नाहीत. त्यांना थोडा जरी रिकामा वेळ मिळाला तरी ते लगेच आपल्या पुस्तकांच्या विश्वात शिरत असत. व मग आम्ही तीन लेकी आणि त्यांची बायको हा संसाराचा व्याप त्यांना तसा त्रासदायकच वाटे.
म्हणजे पुस्तकं हेच त्यांचं दैवत होतं.

माझ्या आईचा देवावर विश्वास आहे काय ? आहे. परंतु, तिला थोडा मोकळा वेळ मिळाला की ती लगेच आपल्या थकलेल्या शरीराला पीडा देऊन नातवंडांना आवडणारा एखादा पदार्थ करते. त्यातून तिला पाच नातवंडं. प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या पार उत्तर दक्षिण ध्रुवाइतक्या एकमेकांशी फारकत घेतल्यागत. आमच्या गल्लीच्या टोकाशी असलेलं शंकराचं मंदिर तिचं फार लाडकं. मात्र तिथेही ती वर्षातून एखादवेळी गेली तर. म्हणजे कदाचित देवालाच कधी वाटलं ही बाई बऱ्याच दिवसांत इथे दिसली नाही, आणि म्हणून त्याने कधी तिचे पाय त्याच्या दिशेने वळवले तरच ! 
आईचे दैवत म्हणजे स्वयंपाकघर.

बहिणी ?
एका बहिणीचे दैवत हे 'गणित हा विषय' आणि विद्यार्थ्यांना तो क्लिष्ट विषय 'प्रेमाने शिकवणे' हे आहे. आणि दुसऱ्या बहिणीची एकूण पाच दैवतं आहेत. माझी लेक, आमच्या दुसऱ्या बहिणीची दोन मुलं आणि तिच्या स्वत:च्या दोन लेकी. ही तिची दैवतं खुष की भक्त खुष.

माझी काय कथा आहे ?
माझा देवाच्या बुद्धीचातुर्यावर गाढा विश्वास आहे. म्हणजे आपला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ आपल्याला अजिबात कळत नाही आणि तो मात्र सगळं 'सेटिंग' बरोबर करीत असतो ह्याच्यावर माझा फारच विश्वास आहे. आणि हा विश्वास त्याने स्वकर्तुत्वाने मिळवला आहे. आज मी जी काही घडले, हे त्याने मला घडवले. कित्येकदा पाडले, अनेकदा ठेचाळले. मात्र हे सर्व काही त्याने ठरवून माझे अगदी 'ट्रेनिंग' केल्यासारखे केले. त्यामुळे हा माझा त्याच्यावरचा विश्वास त्याने स्वत: कमावलेला आहे. त्या विश्वासाला त्याने आजतागायत तडा जाऊ दिलेला नाही.

आणि त्यातून देव सर्वत्र आहे हे मला फार पटते. त्यामुळे हातातली कामं टाकून देवळासमोरील रांगेत उभे रहाणे मला कधीही जमलेले नाही. माझी कामं करण्याची क्षमता, आणि त्यातील वैविध्य हे देवाने आणि मी एकत्र कमावलेलं आहे. मी आपली आहे त्या जागी त्याला नमस्कार करते, आणि पुढे आलेल्या कामाचा फडशा पाडते. माझा त्याच्यावरील विश्वास हा मी उरकलेल्या कामातून त्याच्यापर्यंत पोचतो. रांगेत उभे राहून वेळेचा दुरुपयोग करीत दिलेला पुरावा, माझ्याकडून त्याला अजिबात अपेक्षित नसतो. आणि तसंही देवळात एखाद्या गेलं की तो हळद कुंकू, फुलं लावण्याचा क्रम माझ्या कधीही लक्षात रहात नाही. मग मी आपली माझ्या पुढे असलेल्या माणसाकडे लक्ष ठेवते, आणि त्याने वा तिने ज्या क्रमाने जे काही वाहिलं असेल तसं वहाते आणि नमस्कार करून त्या प्रसंगातून बाहेर पडते.

"माझा 'देवावर' म्हणजे त्याच्या दूरदृष्टीवर विश्वास आहे." मी मैत्रिणीला म्हटले.
तिला त्यातील अर्थ कळला की नाही कोण जाणे. माझ्यापुढील कामाची 'डेड लाईन' त्यावेळी अधिक तातडीची होती.
आणि मला त्याच्या विश्वासाला तडा देणे फारसे आवडत नाही.
:)

Wednesday 13 March 2013

आपण करायचं का हे?

पंकजच्या ब्लॉगवरून कॉपी पेस्ट केलेली पोस्ट आहे...आमचा हेतू निर्मळ आणि शुद्ध आहे...सर्वांनी मिळून हे काम करायला घेतलं आहे...तुमच्या हातभाराशिवाय कुठलं काम झालंय ?! :)

“आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना?” अशी या सगळ्याची सुरुवात झाली.

लहान लहान मुलं. स्कूलबसच्या हॉर्नच्या आवाजावर सोसायटीच्या पेव्हमेंटवर आपली नाजूक पावलं दुडदुडत टाकत आपल्या कार्टूनच्या सॅक्स सांभाळत त्या दिशेने धावणारी मुलं आणि पाठीमागे त्यांचे उरलेलं सामान घेऊन धावणार्‍या मम्मीज. किती सुरेख चित्र आहे नं. पण सगळ्याच गोंडस मुलांच्या नशिबी असं चित्र असतेच असं नाही. कित्येक मुलांना शाळा म्हणजे काय आणि तिथे का जायचं असतं हेच माहित नसतं. आम्ही नाही का न शिकता जगलो, तसंच आमची मुलं जगतील अशाच समजुतीत त्यांचे पालक. पण हेच चित्र बदलण्यासाठी काही मंडळी मनापासून झटतायेत, नव्हे आपलं सगळं आयुष्य त्यांनी तिथे समर्पित केलंय. असेच एक कुटुंब म्हणजे आमटे परिवार. आता याबद्दल आम्ही काही सांगायला नकोच. बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्यापासून सुरु केलेले व्रत प्रकाशकाका, मंदाताई यांच्यासह तुमच्या आमच्या पिढीचे अनिकेतदादा पुढे चालवत आहेत. हर्क्युलसला पृथ्वी तोलताना कमी कष्ट झाले असतील, एवढ्या अडचणी या मंडळी आदिवासी जनतेच्या पुनुरुत्थानासाठी सोसत आहेत. त्यांची ध्येयासक्ती अमर्यादित आहे. त्याच प्रेरणेतून साकार झालेला लोकबिरादरी प्रकल्प. आदिवासी जनतेसाठी दवाखाना, शाळा, वन्य प्राणी अनाथालय असे अनेक लोकोपयोगी उपक्रम या परिवाराच्या पुढाकाराने सुरु केले आहेत.
AmteFamily
त्यातलाच एक म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा. प्रकाशकाका आणि मंदाकाकींची मुलंही याच शाळेत आदिवासी मुलांसोबतच शिकली. या शाळेला दरवर्षी होणारा (रिकरिंग) खर्च म्हणजे शाळेचे युनिफॉर्म्स. प्रत्यक्ष अनिकेत आमटेंचा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पाठवलेला आलेला हा इमेलच त्यांची गरज सांगून देतो.
नमस्कार
इमेल बद्दल आभारी आहे .
रंग महत्वाचे नाहीत. उत्तम दर्जाचे व टिकावू नवीन कपडे हवेत.
२ ते २० वयोगटातील प्रत्येकी २० ड्रेस हवेत.
आता आपण वेगवेगळे पाठवणे म्हणजे वेगवेगळे रंग आणि मापं, शिवाय थोडे महागही पडणार. म्हणूनच आमच्या ब्लॉगर्स मित्रांनी मिळून एकत्र काही तरी करायचे ठरवले आहे. प्रत्येक वयोगटासाठी २०-२५ जोड याप्रमाणे इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या मुलांसाठी कपडे पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येणार्‍या खर्चाचा तक्ता खालीलप्रमाणे आहे.
Screen area1-001
Screen area2-001

आपल्याला काय करता येईल?
आमच्या प्रामाणिक हेतूबद्दल खात्री असेल तर आपला खारीचा वाटा उचलता येईलच. अर्थातच हिशोबात पूर्णपणे पारदर्शकता असणारच आहे.  आपली एकत्रित मदत हेमलकसाला पोचली की सगळा हिशोब ईमेलवर मिळेल. आपली मदतीची इच्छा असेल तर कृपया या लिंकवर जाऊन आपले डिटेल्स भरा.
https://docs.google.com/forms/d/1uk0BrxZC2TqWIF9kJUrs2H3UcTNMoIQj2zPW4cQg_cc/viewform
आपणांस हवी असेल तर आपण डायरेक्टली त्यांनाही आपली मदत पाठवू शकता. परंतु थेंबाथेंबाने पोचणार्‍या मदतीपेक्षा तेच थेंब एकत्र करुन किमान घोटभर का होईना आपण मदत पोचवू शकू ना? म्हणूनच हा प्रपंच !
टीप: आपण वस्तुरुपाने मदत पाठवत असल्याने आयकरात सवलत मिळेल अशी पावती मिळणे शक्य आहे असे मला वाटत नाही. तसा टॅक्स बेनेफिट हवा असेल तर थेट लोकबिरादरीच्या साईटवर डिटेल्स आहेत तिथे मदत पाठवावी. त्याचाही लोकबिरादरीला फायदाच होईल.
http://lokbiradariprakalp.org/getting-involved/donate/

Tuesday 5 March 2013

मग माझी सटकते...

मी चारचाकी चालवते. चार चाकांना आणि दोन चाकांना नियम समान असतात. दोन चाकी बाईक्स डाव्या बाजूने ओव्हरटेक करून माझ्या पुढे जातात, तेव्हा मी त्यांना एखाद्या अरुंद गल्लीत देखील डाव्या बाजूला जागा सोडावी अशी त्यांची अपेक्षा असते. त्या दिवशी मी एका बाइकरला जागा दिली नाही. तो डाव्या बाजूला पडला. सिग्नलमुळे दोन्ही वाहनांची गती धीमी होती. एक दुसराच बाईकर माझ्या गाडीसमोर आडवा आला आणि स्व:घोषित बाजीप्रभू देशपांडेंचे रूप धारण करून माझी खिंड रोखली. मी उतरले.
"काय झालं ? " मी.
"काय झालं म्हणून काय विचारता ? तो पडला तिथे ! दिसत नाय काय तुम्हाला ?" तो.
"दिसलं ना. तो पडला ते दिसलं. तू त्याच्यासाठी भांडायला आलायस का ? छान. "
"अर्थात !"
"थांब थोडा. तो येतोय. त्याला विचारू आपण नक्की काय झालं ते."
पडलेला उठला आणि बाईकवरून पुढे आला.
"काय मॅडम ? दिसत नाय काय तुम्हाला ?" पडलेला माणूस.
"दिसतं ना ! ती अरुंद जागा पुढे जायला पुरणार नाही हे तुला दिसलं नाही काय ? मी तुझ्यासाठी ब्रेक मारायचा...मग तू पुढे जाणार...आणि मग मी गाडी काढावी...असा तू काय मोठा तीर मारलायस ? मी माझ्या गाडीचा ब्रेक मारावा आणि तुला पुढे जगू द्यावं ही तुझी अपेक्षाच का माझ्याकडून ? तू च्यायला मारे मोठ्या अरेरावीत जाणार ! आणि मी तुझ्यासाठी ब्रेक मारू ? बॉस, तुला जगायचं असेल तर जग नाहीतर मारायचं तर मर !" वीर गप्प झाला.
पहिला माणूस थोडं अजून काही बोलला.
"त्याला त्याची चूक कळली...तो गप्प बसला...त्याच्या चुकीवरून तुला काही बोध झाला असेल तर बघ....नाहीतर चालू पड आता." माझी सटकली होती. आणि जे मनापासून आदराने नियमांचे पालन करतात त्यांची का सटकू नये ?

परवा दादर रानडे रोडवरून मी मुख्य रस्त्याला बाहेर पडत होते. गाडी चालवत. सिग्नल वाहनांचा होता. आणि पादचारी भसाभसा चालू लागले. रस्ता ओलांडण्यासाठी. मग मी...कधी माझे डावे वळण घ्यायचे ? नाही म्हणजे माझा सिग्नल लागलाय...म्हणजे मला माझे वळण घ्यायला मिळायला हवे की नको ? परंतु, पाच सहा लोकांच्या अंगावर गाडी घातल्याशिवाय मला वळण मिळणे अशक्य. मग ? आता काय करायचं तरी काय ? आणि वर सगळी समस्त जनता मी गाडी चालवतेय, म्हणून मलाच खुन्नस देणार....मलाच शिव्या घालणार !

मग माझी सटकते !

काय नियम फक्त गाडी चालवणाऱ्या माणसांसाठीच असतात काय ? आणि पादचारी कधीही कुठेही ( कुठेही अशासाठी की दोन रस्त्यांच्यामध्ये घातलेल्या उंच दुभाजकावरून चढून माकडासारखी उडी मारून माझ्या गाडीसमोर दत्त म्हणून उभी रहाणारी जनता मी अनेकवेळा जिवंत ठेवली आहे. )

नागपूर मधील एक बाई देखील मनात आलं म्हणून उजव्या बाजूला सरकल्या. आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ट्रक ड्रायव्हरने ब्रेक दाबला नाही. त्या ट्रक ड्रायव्हरचं नशीब बलवत्तर म्हणून बाई जीवानिशी वाचल्या आहेत.

समोरच्याने मला जिवंत ठेवावे अशी रोज उठून मी माझ्या प्राणाची भिक त्याच्याकडे का मागावी हे मला आजतागायत कळलेलं नाही.

बॉस ! मला नियमांची पूर्ण जाणीव आहे. त्यांच्याबद्दल मला मनापासून आदर आहे. नियमांचे पालन करणे ही एक नागरिक म्हणून मी माझी जबाबदारी समजते. मात्र नियम ही प्रत्येकाने पाळावयाची बाब आहे. गाड्यांना नियम आणि पादचारी कायम समुद्रावर फिरायला निघाल्यासारखे भर रहदारीच्या रस्त्यावर फिरणार...हे का ? आधीही सांगितल्याप्रमाणे मी माज आल्यासारखी गाडी चालवत नाही आणि कधी काळी टॅक्सी केलीच तर मी त्या ड्रायव्हरला पण माज आल्यागत चालवू देत नाही.

XX, त्या मुंग्या पण शिस्तीत चालतात यार !