नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday 30 November 2011

कोरा कॅनव्हास

एक बदक. संथ वहात जाणाऱ्या एका तळ्यातील एक बदक. जशा लहरी उमटल्या तसं ते बदक पाण्याबरोबर वहात होतं. किंवा एक दिशा त्याने ठरवून घेतली. परंतु, त्या दिशेला पुढे नक्की काय येतं...ह्याचा काही थांगपत्ता नव्हता. निघालं आपलं तरंगत. तरंगत. कधी पंख झटकत तर कधी मान वेळावत. आजूबाजूच्या जगात नक्की काय चालू आहे, जग नक्की कुठल्या दिशेने जात आहे काही म्हणजे काहीही माहित नाही.

मी.
बदक.
दहावी द्यायची. आणि जेजेला प्रवेश घ्यायचा. त्यानंतर मग फक्त चित्र काढायची. बाकी काहीच नाही. चाललंय आपलं तरंगत.

'जे जे स्कूल' हे कॉलेजचं नाव आहे. तिथे प्रथम फाउन्डेशन करावे लागते. एक वर्ष. त्यानंतर म्हणजे त्या एका वर्षात तुम्हांला तुमचा कल कुठे आहे ते कळते असा एक समज आहे. म्हणजे तसे कळायलाच हवे. कारण पुढे जाऊन चार वर्षे बदकाला 'अप्लाइड आर्ट' किंवा 'फाइन आर्ट' ह्या दोनांपैकी एका प्रभागात प्रवेश घ्यावयास हवा. पण हे बदकाला अजिबात माहिती नव्हते. अख्खं वर्ष गेलं तरी तो काय तो कल कुठे आहे हेही कळले नव्हते. अप्लाइड आर्ट म्हणजे काय ? आणि फाइन आर्ट मध्ये कागद, पेन्सिल्स, रंग ह्यांचे नक्की काय करतात काही माहित नाही. भाजी की भरीत ? कोण जाणे ! अशी परिस्थिती ! अज्ञानात सुख असतं ! कारण आपल्याला काहीतरी माहित नाही आहे हेच माहित नसतं ! मग ते फाउन्डेशनचं एक वर्ष संपत आलं. कल कुठे आहे हे समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने चालून झालं...आणि काय माहित कोणी सल्ला दिला पण मी अप्लाइड आर्टला प्रवेश घेतला. आता मागे वळून बघितलं तर कळतं. कॉलेजमधील पुढील चार वर्ष आणि बाहेरील उघड्या जाहिरात क्षेत्राचा, तसा काडीचाही संबध नव्हता. म्हणजे आज मी जे काही करते ते मी तिथे शिकले का ? तसं नाही वाटत. कारण, प्रवाहात तरंगणं वेगळं आणि पाण्यात हातपाय मारून पुढे जाणं वेगळं. 

शिक्षण चालू असता आम्हीं सर्व विद्यार्थ्यांनी संप केला. म्हणजे आमच्या पुढाऱ्यांनी वगैरे आम्हांला सांगितले की आता उद्यापासून वर्गात बसायचे नाही. त्या ऐवजी सर्वांनी विद्यापीठाच्या बाहेर रस्त्यावर बस्तान मांडायचे. मग आम्ही सर्वांनी तसेच केले. संप बरेच दिवस चालला. आम्हीं बरेच दिवस रस्त्यावर बसलो. अगदी खाऊचा डबा वगैरे घेऊन रस्त्यावर. आणि डबा खायची कॉलेजची वेळ झाली की मग रस्त्यावर डबा उघडायचा आणि खायचा. संपाचे कारण मोठे होते. आणि बरोबर देखील होते. इतके पाच वर्षांचे शिक्षण घेऊन देखील पूर्वी आम्हांला फक्त डिप्लोमाच मिळत असे. हे चुकीचे आहे असे सगळे पुढारी म्हणाले. हे पुढारी म्हणजे कॉलेजची वरच्या वर्गांतील मुले वगैरे. मग आमची मागणी मान्य झाली. आम्हांला डिग्री देण्यात यावी असा निर्णय झाला. परंतु, त्यासाठी सहा महिन्यांचा एक 'ब्रिज कोर्स' आखण्यात आला. पुढील काही वर्षांसाठी. बाबा म्हणाले की डिप्लोमाचे काही खरे नाही. तुला डिग्री घेतलीच पाहिजे. मग पाच वर्षे पूर्ण झाल्यावर मी पुन्हा एकदा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बाकी कुठल्याही मैत्रिणीचे आईवडील असे काही बहुधा म्हणाले नसावेत. कारण एकटी मी परत एकदा कॉलेजला जाऊ लागले होते.

ह्या ब्रिज कोर्सच्या अभ्यासक्रमात 'History Of Art' हा एक विषय होता. म्हणजे पुस्तकं वगैरे होती. आणि एक गोंडसश्या दिसणाऱ्या बाई येत असत. बरीच माहिती देत असत. जगभरच्या कलाविश्वाची. त्यात इमारती, पेंटिंग, भांडीकुंडी सगळेच येत असे. विविध देश. विविध कला शैली. भली मोठी पुस्तके. लांबच लांब नोट्स. आता हा अशा प्रकारचा अभ्यास करण्याची सवय तर मोडली होती. शेवटचा अभ्यास दहावीत केला होता. म्हणजे एकदम घोकंपट्टी वगैरे. त्यावर पाच वर्षे उलटून गेली होती. आणि पाच वर्षे म्हणजे अर्धे दशक. मग परीक्षेच्या दिवशी पहिल्याच पेपरला अगदी पेनाचं टोपण काढलं आणि लिहायला सुरूवात करावी म्हटलं तर काही म्हणजे काहीही आठवेना. अगदी म्हणजे कसं डोकं कोणी उघडावं, त्यावर एखादा टीपकागद ठेवावा आणि सगळं कसं टिपून घेऊन जावं. म्हणजे डोकं कसं पुन्हा रिकामं. रिकामा घडा. मग कसं कोण जाणे थोड्या वेळाने आठवलं. आणि लिहिली पूर्ण उत्तर पत्रिका. कधीतरी पुढे निकाल लागला. मी उत्तीर्ण झाले. अगदी पदवीधारक. BFA. कंसात बॅचलर ऑफ अप्लाइड आर्ट.

आता ह्या सर्व गोष्टींना बरीच वर्षे उलटून गेली. मात्र अजून मध्ये मध्ये उगाच वाटत असे. कॅनव्हास आणावा. पेंटीग सुरु करावे. ग्राफिक वगैरे. म्हणजे उगाच रियालिस्टिकच्या फंदात आपण पडू नये. आपण आपले कसे ग्राफिक करावे. म्हणजे जगविख्यात चित्रकार पिकासो सारखे. नाक उत्तरेला आणि डोळा दक्षिणेला. वगैरे वगैरे. 

परवा स्पेनमध्ये असताना बार्सिलोनाला जाण्याचा योग आला. बार्सिलोनामध्ये पिकासोची आर्ट गॅलरी आहे. त्याच्या कलेचे दालन. त्याच्या कारकीर्दीच्या सुरवातीच्या काळातील चित्रे तिथे बघावयास मिळतात. गल्ल्याबोळ शोधतशोधत मी तिथे पोचले. स्पेनमधील गल्ल्या काय आणि तेथील बोळ काय. सर्वच सुंदर. त्यामुळे त्या दालनाचा शोध तसा रम्यच झाला. दालनाबाहेरील जग मात्र वेगळं होतं. म्हणजे जर रविवार म्हणून गल्ल्या सुन्या म्हटल्या तर दालनासमोर गजबजाट. मग रांगेत उभी राहिले. तिकीट काढलं. दगडी पायऱ्या चढले. आणि काचेच्या दरवाजासमोर पोचले. पाब्लो पिकासो. तिथे तिकीट दाखवलं. प्रवेश मिळवला. 

पिकासो. 'क्युबिझम' ह्या कला चळवळीचा प्रवर्तक. एखादी वस्तू वा एखादा चेहेरा, हा एकाच कोनातून न बघता वेगवेगळ्या कोनांमधून एकाच वेळी बघणे. व तसे चित्रात उतरवणे. यामुळे आपल्या डोक्यात वर्षानुवर्ष जे नियम घट्ट बसून राहिलेले आहेत एखादी गोष्ट बघण्याबाबतचे, त्यालाच पार तडा वगैरे. आणि आपल्याला नवी दृष्टी...
हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास. हे इतपत मला ज्ञात होते. 

मी दालनात प्रवेश केला. थबकले. माझ्या समोर साक्षात पिकासोची चित्रे होती. मुंबईत कधी काळी त्याच्या चित्रांचे प्रदर्शन झाले होते. त्यावेळी आई बाबांना घेऊन मी तिथे गेले होते. 'क्युबिझम' मधील त्याची चित्रे. त्रिकोण, चौकोन, पिवळा, लाल, हिरवा. परंतु येथील पहिले दालन ? पहिल्या दालनात पहिल्या चित्रासमोर मी उभी राहिले. आणि पुन्हा पुन्हा बघत राहिले. अतिशय रियालिस्टिक पोर्ट्रेट. त्यापुढे तितकेच खरेखुरे लँडस्केप. मग त्यापुढे अशीच कितीतरी खरीखुरी चित्रे. जसा निसर्ग तशी त्याची चित्रे. तसेच हुबेहूब रंग. तेच पर्स्पेक्टीव्ह. हा पिकासो मला माहितीच नव्हता. मला ह्याची ओळख देखील नव्हती. पिकासो म्हणजे ठळक रंग, वेडेवाकडे आकार. मुक्त. स्वैर. त्यांना मी ओळखत होते. पण आज जे नजरेसमोर होते ते काही भलतेच. बिछान्यावर आजारी स्त्री, तिचा अशक्त हात हातात धरून तिची नाडी तपासणारा काळ्या कोटातील डॉक्टर आणि पलीकडे कडेवर मुल घेऊन उभी असली जोगीण. हे कसे शक्य आहे ? अशक्य ! म्हणजे पिकासोच्या रक्तारक्तात नसानसात माणसाची अॅनाटॉमी इतकी भिनलेली होती...म्हणून तोच फक्त तोच इतके स्वातंत्र्य घेऊन मुक्तपणे वेगवेगळ्या कोनांमधून मनुष्याच्या शरीराकडे बघू शकत होता ! एकाच वेळी. मी कोपऱ्यात उभी राहिले. मला हसू फुटले. मला आठवले किती वेळा कळत नकळत माझ्या मनात हा विचार येऊन गेला होता...पेंटिंग सुरु करावे...रियालिस्टिक नको...ग्राफिक करावे...पिकासोसारखे...इथे डोळे...तिथे नाक...वगैरे वगैरे...हसू आलं...अज्ञानाचा पडदा माझ्या उघड्या डोळ्यांनी फाडला.
पिकासो काही वेगळाच होता. जे कॉलेजमध्ये घोकलं होतं...ते कोण जाणे काय होतं....त्यावर डिग्री मिळवली...बाबा सुखावले. मात्र आज मी सुखावले...हसले...माझे अज्ञान अफाट होते. आणि आज ते दूर झाले होते.
वाटले पुन्हा जे जे च्या त्या भव्य दारातून आत शिरावे. व्हिटी स्थानकासमोरचा तो दरवाजा. दाट जुने वृक्ष. वाऱ्याच्या झुळकीबरोबर हलणारी हिरवी पाने. चोरून जमिनीकडे धाव घेणारी सूर्याची ती नाजुकशी किरणे. मोजून गोळा केल्या तर शंभर तरी जमतील अशा त्या लालचुटूक गुंजा. सकाळचे फक्त साडेसात वाजलेले असावेत. दोन वेण्या. नाकावर जाड भिंगांचा चष्मा. मात्र ह्यावेळी उजव्या बाजूला वळावे. डाव्या हाताला आर्किटेक्चरची इमारत पार करावी आणि त्या अद्वितीय फाइन आर्टच्या इमारतीत शिरावे.
म्हणावे...मला प्रवेश द्या...
मला चित्रकला शिकवा.






















(शेवटचे छायाचित्र जालावरून साभार)

Monday 28 November 2011

स्पॅनिश निरोप...

आकाश खरं तर दुसऱ्या देशाचे होते. म्हटले तर परके. करडे. दाट. जसे दूर कुठेतरी कोणाचे मन दाटून आलेले असावे. बंद पापण्यांच्या काठाशी अश्रू वाट बघत असावेत. रस्ता रुंद. स्पेनमधील मायोरका बेटावरील एक रस्ता. आणि त्या रस्त्यावर, छत धरून ठेवणारे आकाश. कधीकधी कोसळणारे छत. फुटून ओसंडून वहाणारे छत. तसाच होता तो अनोळखी काळा रस्ता. आणि त्याचे ते करडे छत.

आम्हीं गाडीत बसलो होतो. बाहेर पडलो होतो स्पेनच्या त्या हलक्या थंडीत. मी, माझी बहिण, तिचा नवरा आणि माझ्या चिमुकल्या दोन भाच्या. वय वर्षे पाच आणि आठ. दोघी माझ्याबरोबर मागे बसल्या होत्या. बहिण आमची दिशादर्शक तर तिचा नवरा आमचा वाहक. आणि सोबत GPS वरील बाई. विश्वास न टाकता येण्यासारखी. ती काहीही बरळत असते...असे माझे आता स्पेनला जाऊन आल्यापासून ठाम मत बनले आहे. त्या बाईच्या नादाला लागून आम्ही कधी मायोरका बेटावर तर कधी फ्रान्सच्या जंगलात मिट्ट काळोखात भरकटलो. बहिणीच्या कर्तृत्वाच्या जोरावर आम्ही शेवटी मार्गाला लागलो हे नक्की. आज माझ्या घरात टेबलावरील मॅकवर बसून ही पोस्ट लिहिताना ते दाट जंगल व तो काळोख मात्र आठवतो.
"मावशी, तुला माहितेय का आपलं हॉटेल कुठे आहे ते ?" पाच वर्षांचा स्वर. खोल. घाबरलेला.

असो. विषयांतर होतंय.

मी खिडकीबाहेर नजर टाकली. आणि अकस्मात ती दिसली.
आयरिस. ढगाळ आभाळात एका टोकावर हळूच उमटली. क्षणार्धात प्रवास करीत दुसऱ्या टोकावर जाऊन पोहोचली.
GPS बाईच्या मदतीशिवाय.

आयरिस.
वेगवान गतीने जगाच्या ह्या टोकापासून त्या टोकावर काही क्षणांसाठी विसावणारी, सप्तरंगी आयरिस.
देवाचा निरोप. पृथ्वीपर्यंत पोहोचवणारी.
ग्रीक पौराणिक कथांमधील देवता.
इंद्रधनुषी.

काही क्षण निसटले आणि मी कधीही न बघितलेले मला काही दिसले. ना कधी बघितले. ना असे काही घडते हे माहित होते.
एक नव्हे. दोन आयरिस !
जणू देवाचा आजचा निरोप काही वेगळाच होता. फार महत्त्वाचा होता.
काय म्हणून तो एकट्या आयरीसवर विसंबला नव्हता ?
त्याने जुळ्या पाठवल्या.
जुळ्या बहिणी.
एक आली पुढे.
धाकटी तिची पाठराखीण.
तितक्याच नम्रतेने उमटली.
थोरलीचा मान राखून.

जुळं इंद्रधनुष्य.
असा काय होता तो गूढ निरोप ?

निसर्गाचा.
पृथ्वीसाठी....?


Wednesday 16 November 2011

बाई-माणूस

चार चाकांच्या गाडीला चार चाके असतात.
ह्म्म्म...म्हणजे ? म्हणजे काय म्हणायचं तरी काय ? कर्णाच्या रथाला किती चाकं होती ? मागे दोन चाकं आणि पुढे घोडे. मागचे एखादे चाक निखळून पडले तरी देखील पुढचे घोडे, फरफटत का होईना पण रथ चालवू शकत असावेत. आधुनिक जगाच्या गाड्या आणि गाडीची चार चाके. पुढे दोन आणि मागे दोन. समोरील रस्ता पुढील चाकांच्या दृष्टीस अगोदर पडतो. म्हणजे पुढे जे काही संकट येईल त्याला ही दोन चाके आधी तोंड देतात काय ? अर्थात संकटे चोहोबाजूने येऊ शकतात ! प्रश्र्न असा आहे की ह्या पुढील चाकांचा मागील चाकांशी काही संवाद असतो की नाहीच ? म्हणजे ते चौघेही चालवतात एकच गाडी परंतु, एकमेकांशी काडीचाही संवाद न साधता ?
आणि जर तसे आहे असे मानले तर त्यात एक गैरसमज होण्याची संभावना अधिक दिसून येते. केवळ सुसंवाद नसल्याकारणाने. पुढील चाकांना वाटू शकते की माझ्यामुळे ही गाडी चालते व मागील चाकांना वाटू लागते की माझ्यामुळेच ही गाडी पळते.

ही झाली एक गोष्ट.

दुसरी ?
दुसरे असे की त्यातील एका जोडीला असे वाटू शकते की मला सगळेच येते. मला त्या दुसऱ्या दोन चाकांची गरजच काय ?
तर दुसऱ्या जोडगोळीला वाटू शकते की माझी गरजच काय ? कोणाचेच काहीही अडत नाही.

ह्यातील कोणतेही विचार त्या गाडीला घातक.
एकाला 'ग' ची बाधा तर दुसऱ्याला न्यूनगंड.

कसा चालायचा संसार ?

मल्टी टास्किंग.

सुग्रास जेवण ?
करता येते.
धुणी भांडी ?
करता येतात.
केर लादी ?
येते.
पोरांची शी शू ?
काढता येते.
वृद्धांची सेवा ?
करता येते.
मिटिंगा फिटिंगा ?
येतात.
बँकेची कामे ?
येतात.
पैसे कमावता ?
येतात.

कठीण.
कुठेही म्हणजे काहीही अडत नाही.
जोडीदाराशिवाय.

आज सगळं गणित चुकीचं वाटत आहे.
अंगावर पडत गेलं...मी शिकत गेले...
हे मला येत नाही किंवा हे माझं काम नाही त्यामुळे मी ते करणार नाही असं फक्त म्हटलं नाही.
दूरदृष्टीचा अभाव !
त्यामुळे आपण सगळीच कामं आपल्या गळ्यात पाडून घेतली आहेत हे कळलं नाही.
जोडीदाराच्या अंगावर जबाबदारी पडत नाही आहे हे लक्षात आलं नाही....म्हणजे कसं....कायम ब्रम्हचारी...बॅचलर वगैरे.

चुकलंच म्हणायचं.
आज हे वाटून काडीचाही उपयोग नाही हे तर सर्व जगाला माहित आहेच.

त्यापेक्षा...
मी ? मी जाऊ बँकेत ? मला नाही रे कळत तिथे काही.
काय ? मी पैसे कमवू ? ते कसं करायचं बाई ? जळलं मेलं ! मला मेलीला काय कळतंय त्यातलं ?
किती दिवस झाले बघ ना ! वरती माळ्यावर ना त्या तिथे कोपऱ्यात एक स्टीलचा डबा आहे. त्यात ना मी ती एक पळी ठेवलीय. आठवते का तुला ती ? ती रे, शेजारच्या काकूंनी दिलेली ! संक्रातीला ! हा ती ! कित्ती दिवस झाले म्हणतेय ती वापरायला काढावी ! जरा देतोस का काढून ?
अरे ! रात्रीचा एक वाजलाय ! बघ ना ! आपल्या लेकीला केव्हढा ताप भरलाय ! जा पाहू ! त्या रानडे रोडवर जो केमिस्ट आहे ना तो म्हणे रात्रभर उघडा असतो ! म्हणजे त्याचं दुकान रात्रभर उघडं असतं ! आण पाहू क्रोसिन !

म्हणजे कसं समोरच्याच्या हे मनात बिंबायलाच हवं...आपल्याशिवाय हे घर चालत नाही !

आता गेला बाजार उदाहरणादाखल एक प्रसंग.

कमोडवरील सीट कव्हर तुटलं होतं. तीन चार वर्ष.
"अगं, किती दिवस मी बघतोय ! घेऊन ये ना ते कव्हर !"
"म्हणजे ? तुला नाही येत का आणता ? की तू घराबाहेर पडतच नाहीस ? की मी माझ्या हौसेखातर लग्न केलंय ? आणि हा संसार एकटीच्या डोक्यावर घेतलाय ?"
"किती बोलतेस ?!"

हम्म्म्म.
एकदा का कळलं की आपल्यावाचून काहीही अडत नाही की माझ्या बाबतीत तर माणूस मरायला मोकळा !
म्हणजे अगदी ढगाबिगात !

त्यापेक्षा...गाडीच्या त्या प्रत्येक चाकांनी लक्षात घ्यावं...आपण जर नाही हातपाय हलवले तर ही संसाराची गाडी मुळात रस्ताच सोडेल ! किंवा चाकांनी एकमेकांना नेहेमी जाणीव करून द्यावी...तुझ्यावाचून काही खरं नाही हा माझं ! वगैरे वगैरे...

म्हणजे कसं...
मी नाही जा ! तू जा ना रे बाजारात ! तुझ्यासारखं ना मला नाहीच कळत काही त्या मेल्या माश्यांमधलं !
लाडेलाडे.

बहुतेकवेळा तरी बायकांना बहुतेक कामे येतात. अंगावर पडली की जमून जातात. परंतु, हे आपण आपलं मनात ठेवावं. समोरच्याला ते कळता कामा नये ! उगा पुढेपुढे करू नये...'तू झोप रे...मी आत्ता येते बघ बँकेत जाऊन'...असलं काहीतरी वेड्यासारखं बाईमाणसाने बोलू नये !
घरातली कामं कशी ठप्प झाली पाहिजेत.
जोडीदार देखील खुष.
थोडा पुरषी अहंकार सुखावलेला.
थोडं प्रेम उफाळलेलं...
आपल्या वेड्याखुळ्या बायकोबद्दल.
आपलाच त्यात फायदा !
नाही का...?

हम्म्म्म...
माझं मल्टी टास्किंग.
एक व्यक्ती म्हणून भरपूर शिकवून जाणारं ...
स्वत:च्या पायावर खंबीरतेने उभं करणारं...

गाडीने रस्ता सोडला नाही.
वेग कमी केला नाही.
आणि तरीही...
प्रवासात अर्ध्या रस्त्यावर निखळून गेलेल्या एका चाकाची सतत आठवण करून देणारं...
माझं मल्टी टास्किंग.

Friday 11 November 2011

कट्टी ?!

चारशेवी पोस्ट....
ह्या पोस्टनंतर एक वेगळीच गोष्ट घडली...म्हणजे मी लिहिताना १२९ मित्र मैत्रिणी होते...आणि म्हणून मी तसं लिहिलं पण होतं ना पोस्टमध्ये ! पण लिहून पोस्ट केल्यावर एका दिवसात तो आकडा घसरला आणि एकदम १२८ झाले...म्हणजे मग मला त्या पोस्टमध्ये जाऊन एकदम बदलच करावा लागला....१२९ वरून १२८ !
एकाशी/एकीशी मैत्री तुटली !

का बरं ?
आणि कोणाशी बरं ?

लहानपणी काहीतरी कुठेतरी भांडण होत असे आणि एकदम कट्टी घेतली जाई.
म्हणजे एकदम...कट्टी तर कट्टी...बारंबट्टी...बारा महिने बोलू नको...लिंबाचा पाला तोडू नको...आमच्या घरी येऊ नको ! हे असं काही तरी. म्हणजे जिच्याशी कट्टी घ्यायचीय ना तिची करंगळी आणि माझी करंगळी...एकमेकांत गुंतवायच्या आणि गोल फिरवायच्या...म्हणजे जर खूपच राग आला असेल ना तर तुम्हीं एकदम जोरात पिळू शकता...म्हणजे तिला अगदी दुखायलाच पाहिजे...त्या कट्टीची आठवण कशी आयुष्यभर लक्षात रहायला हवी !

कट्टी चालू राहू शकते एखाददुसरा दिवस...तो एखाददुसरा दिवस किती जड...किती दु:ख.

मग जेव्हा ही जीवघेणी कट्टी संपवायची असेल ना त्यावेळी मधलं बोट आणि त्याच्या जवळचं बोट असं पुढे करायचं दोघींनी...आणि एकमेकांना स्पर्श करायचा....म्हणजे मग झाली बट्टी ! आता बोलू शकतो आपण ! 

एक मात्र आहे...त्या अबोल्यात एक नक्की होतं...मला माहित तरी असायचं ना की कोणी माझ्याशी कट्टी घेतलीय !!
ह्या नेट प्रकरणात ते पण कळत नाही !
म्हणजे आता कोण माझ्याशी बोलत नाही...हेच मला कळत नाहीये !
कोणाशी माझी मैत्री तुटलीय तेच मला माहित नाहीये !

हे असं बरोबर आहे का ??
:(

:)

Thursday 10 November 2011

नोंद

एक भला मोठा मग
त्यात दोन चमचे साखर
साखर टाकताना नाही पण साखर टाकता क्षणी लक्षात आलं
आत एक मुंगी होती
इथेतिथे फिरत असावी
रोजची लगबग चालू असावी

आता येईल मग येईल
साखरेच्या ओझ्याखालून मुंगी बाहेर येईल
तब्बल एक मिनिट डोळे लावून
मी तिची वाट बघितली
पण नाही
मुंगी वर नाही आली

मी त्यावर कॉफी टाकली
गरम पाणी टाकून कॉफी घोटाळली
स्मशानभूमीची कॉफी मी पिऊन टाकली

एक ध्यानी आले
'त्याचे'ही तसेच असावे
वरती बसून खाली बघावे
एक मरतो
एक जन्म घेतो
रोज उठून त्याचे काय सोयर सुतक पाळावे
फक्त एक नोंद करावी....
'तिचे चांगलेच झाले....
सुखाचा अतिरेक झाला...
आणि सुखाच्या ओझ्याखाली वेडी मुंगी मरून गेली'

Wednesday 9 November 2011

माझे घर...माझा रस्ता...

तो काही वेगळा दिवस नव्हता. सूर्य उगवला. मी उठले. कामं आटपली आणि बाहेर पडले. आमच्या एका गल्लीच्या तोंडाशी एक विहीर आहे. मुंबईत हे ऐकलं की कसं अप्रूप वाटतं. परंतु, ते फक्त दूर राहून वाटू शकतं. म्हणजे, 'दुरून डोंगर साजरे'च्या धर्तीवर. ज्यांच्या अरुंद अशा गल्लीत विहीर देखील असते त्यांना त्या विहिरीच्या मालकाचा बहुतेक वेळा त्रासच होतो. जसा आठवड्यातून किमान चार दिवस मला होतो. घड्याळाच्या काट्यावर जीव अडकवून, गाडी काढून बाहेर पडावं आणि विहीर उपसून, पोटात तुडुंब पाणी भरून, तीन चार टँकर्स बाहेर पडावेत. वेगवेगळ्या दिशेने. आणि दिशा पकडण्यासाठी, ही टँकर्सची धूडं कधी डावीकडे, कधी उजवीकडे, पुढे, मागे तर कधी अगदी १८० अंशांत फिरत असतात. मग तुम्हांला शहराची कुठलीही दिशा का धरावयाची असेनात, त्या क्षणी तरी त्या अजस्त्र धूडाला वाट करून देणे तुम्हांला भाग असते. आणि म्हणून 'का बरं आमच्या गल्लीत विहीर आहे' असा एक उद्वेग मनात डोकावून जातो.

त्या दिवशी ह्या अशाच प्रकारे दिवसाला सुरुवात झाली. एक टँकर उंट बनून गोल वळत होता. माझ्या पुढे दोन गाड्या थांबल्या होत्या. मी देखील थांबले. जवळच कॉलेज असल्याकारणाने तरुणाई इथे तिथे फिरताना नेहेमीच आढळते. मान उंचावून दूर नजर टाकली तर उंट अगदी तोल सांभाळत वळत होता. ह्यात किमान पंधरा मिनिटे सहज निघून जाणार होती. 'लेट मार्क' निश्चित होता. खिडकीबाहेर काही विद्यार्थी उभे होते. उंटाची कसरत बघत. माझ्या उजव्या बाजूला देखील अशीच वर्दळ थांबली होती. तेव्हढ्यापुरता दिवस जसा तटस्थ झाला होता. आरशातून बघितलं तर मागे आता तीन चार गाड्या येऊन उभ्या राहिल्या होत्या. तेव्हढ्यात, त्याने कावा साधला.
काय बरं झालं ? माझ्यापासून थोडं पुढे उभा असलेल्या एका मुलाने त्याच्या हातातील कागदाचा बोळा रस्त्यावर फेकला. काळा रस्ता. त्यावर पांढरा बोळा. नाही चांगला दिसला. टाकणारा उंटाकडे बघत उभा होता. त्याच्या मते त्या कागदाशी असलेला त्याचा संबंध संपलेला होता. परंतु, त्याच्या दुर्दैवाने गाडीत मी होते. आणि मला तरी ते तुटते संबंध रस्त्यावर येणे पटले नाही. मी गाडीतून उतरले. बोळा उचलला. त्याच्याकडे गेले. "तुला नको आहे का हा कागद ?"
"अं ?.....हो....काय झालं ?"
"नको असेल तर तुझ्या घरी टाक ना...कुठेही टाक...पण तुझ्या घरात....माझ्या ह्या रस्त्यावर नको."
मागे एक बाई उभ्या होत्या. मध्यमवयीन. नाकावर चष्मा. अंगावर साडी. फिसकन हसल्या. आजूबाजूची लोकं आमच्याकडे बघू लागली. मुलगा कावराबावरा झाला. त्याने त्या नको झालेल्या कागदाला पुन्हा खिशात सारलं. मी गाडीत जाऊन बसले. उंट हलला. गाड्या आपापल्या मार्गाला लागल्या.

आमच्या घराचे केरलादी वैभवी करते. सकाळीच. त्यामुळे मी बाहेर पडते त्या आधीच घर लख्ख होऊन जाते. खुशीत हसू लागते. परंतु, वैभवी साफ करणारच आहे म्हणून मग दिवसभर मी व माझी लेक काय इतस्तत: कागदाचे बोळे फेकत रहातो ? थुंकाथुंकी करतो ? नाही. का बरं ? कारण हे आमचं घर आहे. मग काय तो रस्ता माझा नाही ? तो साफ ठेवण्यासाठी जो माणूस काम करतो, त्याचा पगार देखील माझ्याच पगारातून जात असतो. मग ? मग काय म्हणून त्या मुलाला, मी माझा रस्ता त्याच्या XXचा असल्यासारखा वापरू देऊ ?

अजून एक गोष्ट.
ह्यातून मी नक्की काय साधलं...असला विचार करणं मी बंद केलेलं आहे. त्या क्षणी तो मुलगा खजील झाला. त्या बाई हसल्या...आजुबाजूची माणसे बघू लागली...आणि मी मिळवली. मग त्याचे ते खजीलपण क्षणभंगुर का असेनात...पुढल्या गल्लीत जाऊन त्याने तो बोळा पुन्हां एकदा रस्त्यावर का फेकला असेनात.

जे करता येण्यासारखे होते...तितके मी केले होते.
मी तो क्षण गमावला नव्हता.
कमावला नक्कीच होता.
निदान माझ्यासाठी.

Sunday 6 November 2011

चांदण्यात फिरताना...


सहज आशा भोसल्यांची सीडी टाकली...मॅकच्या पोटात...आणि हे गाणं सुरु झालं...
कस्सलं रोमँटिक गाणं आहे हे ! आणि तितकंच फसवं !
हे असलं वेडं गाणं वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी ऐकायचं आणि मग त्या वेड्याखुळया वयात वाटायला लागतं, खरंच सगळं जग असं सुंदर असतं आणि हे असंच चांदण्यात फिरतफिरत आपण आपला संसार करणार असतो ! आणि मग डोकं फिरतं ! म्हणजे अगदी स्वप्नबिप्न ! चांदणी रात्र....हातात हात.....हळूवार क्षण आणि हळूवार स्पर्श !
बोडकं माझं ! धादांत थापा आहेत ह्या !
असलं काहीच नसतं ! रात्र चांदणी नक्की असते...आपल्या कडेवर आपलं चिमुकलं  बाळ असतं...आणि आपल्या आयुष्याच्या साथीदाराचा मित्र त्या रुपेरी समुद्रावर आपला फायदा घेऊ पहातो...आपला जोडीदार तर पिऊन टाईट आहे यार ! सांभाळा स्वत:ला ! कारण नीतिमत्तेची जबाबदारी फक्त तुमच्या खांद्यावर टाकलेली आहे ! जोडीदाराच्या नाही !

कसले थरथरतायत हात...हे टाईप करताना !

सांगितलं ना...प्रेमकथा कधीच रुपेरी नसतात....नाजूक नसतात....आणि त्या कधीच चंदेरी नसतात !

त्या दारू पिऊन एकजात टाईट असतात भाऊ !

काही खरं नाही...
वाटतं...मी कायम एका उंचचउंच कड्यावर उभी असते....
काही क्षुल्लक कारण घडतं...आणि मी त्या खोल गर्तेत कोसळते...!

हे असं एखादं नाजूक सुंदर गाणं देखील कारणीभूत ठरतं...
माझ्या नकळत मला गर्तेत ढकलून द्यायला !
 

Friday 4 November 2011

चारशेवी पोस्ट...

ही चारशेवी पोस्ट.

आम्ही ज्यावेळी क्लायंटसाठी मोठमोठी प्रेझेन्टेशन्स बनवतो त्यावेळी बरेचदा मोठा पोर्टफ़ोलिओ भरभरून कामं घेऊन जातो. कारण ते शक्ती प्रदर्शन असते. शक्ती आकड्यांमधील. तीच ताकद त्या भल्या मोठ्या पोर्टफ़ोलिओमधील कामात देखील असली तर आम्हांला तो क्लायंट मिळतो. आमच्या लांबलचक यादीत अजून एक भर पडते.
माझा भर किंवा विश्वास म्हणा,  नेहेमी आकड्यापेक्षा त्यातील मालमसाल्यावर असतो. उदाहरणार्थ, आत १२० कामे आहेत परंतु, त्यातील मुख्य आत्माच गायब आहे तर मग काय उपयोग ? आम्ही मात्र बहुतेकवेळा ढीगभर कामे नेतो व त्यासाठी दिवसरात्र मेहेनत करतो. शेवटी हे सर्व पैश्यासाठी. आत्मा साथीला असो वा नसो.

...तर ही चारशेवी पोस्ट.
जवळजवळ दीड वर्षातील.
४५,६०० वेळा वाचकांनी भेटी दिल्या.
आणि १२८ मित्रमैत्रिणी जमा झाले. 
हे सर्वात महत्त्वाचं. माझ्यासाठी.
:) म्हणजे हे माझे शक्ती प्रदर्शन का ?
...परंतु, हे माझ्या आत्म्याची साथ न सोडता आपोआप घडत गेलेले आहे.
उलट आत्म्याची साथ कधीच न सोडल्यानेच हे घडले असावे.
...आणि म्हणूनच इथे येऊन ब्लॉगवर लिहिणे मला मनापासून आवडते.
एकही थाप न मारता....एकही खोटे स्वप्न न विकता.
:)

...तर हे सर्व असे आहे...आणि आज म्हणून फक्त सुंदरसं गाणं ऐकुया.
मला खात्री आहे ह्या गाण्याच्या आवडीबद्दल देखील आपले एकमतच असेल.
:)

Thursday 3 November 2011

गढूळ पाणी

काही नळ असे असतात की ते तुम्हीं चालू केलेत तर त्यातून फक्त गढूळच पाणी येऊ शकते. 
कारण त्या पाण्याचा साठा जिथे आहे ते उगमस्थान मुळात गढूळलेले असते. कधी एकाच जागी राहून तुंबलेले...त्यावर शेवाळ जमू लागलेले. तर कधी विविध प्रकारच्या गरज नसलेल्या वस्तूंनी भरून गेलेले. तेथील आसमंतात एक प्रकारचा कुबट वास भरून राहिलेला असतो. तो जलसाठा असा नसतो,  ज्याच्या काठाशी दोन क्षण विसावावे...आणि मनावरचे मळभ दूर होऊन जावे.
मग जर उगमच नासका तर त्यातून निघालेले पाणी कोणा वाटसरूची तहान कशी भागवणार ?

अशी माणसे आपल्या आयुष्यात येतात. आणि कधी टाळता न येण्यासारखी असतात. आपल्या मेंदूचा ती नाश करू लागतात. म्हणजे हे नकळत चालू असलेली विषबाधाच म्हणायची. काय हे सर्व ते जाणून बुजून करतात ? नाही. परंतु, नकारघंटा त्यांच्या डोक्यात सतत घणघणत असते. ती ते नाही थांबवू शकत. आणि आपल्या कानावर त्याचा कटू नाद येतच रहातो...आपली इच्छा असो वा नसो.

नळाची उपमा. त्याला नकारघंटेचा नाद.

कचेरीतील सहकाऱ्यांचे दोन गट पाडू शकतो का ? शत्रू वा मित्र. सगळ्यांशी आपण काही मैत्री करू शकत नाही पण त्यामुळे ते आपले शत्रू बनत नाहीत. परंतु, त्यांच्याबरोबर काम तर करावेच लागते.  कधी त्यांची जबाबदारी तुमच्यावर टाकली जाते. कारण त्यांना बडतर्फ केले जाईल अशी परिस्थिती असते. हे असे घडू नये असे आपल्याला मनापासून वाटत तर असते. परंतु मग त्यांना वाचवता वाचवता आपण आपला मेंदूच किडींसाठी उघडा करून ठेवला आहे की काय अशी शंका येते. म्हणजे हळूहळू नकारात्मक विचारांची कीड, आपला मेंदू पोखरू लागेल...आणि अकस्मात लक्षात येईल, ताटलीतील मेंदू संपत आलेला आहे. ते गढूळ पाणी पिऊन पिऊन शरीरात विष पसरत जाईल आणि मग ज्या सकारात्मक विचारांच्या बळावर उभे रहाण्याची ताकद हे शरीर मिळवत आले आहे तीच ताकद एक दिवस शरीर गमावून बसेल.

एकाच मिटिंग वरून आम्ही दोघे परत येतो. आणि आमच्या दोघांच्या बॉसला, काल क्लायन्टबरोबर झालेल्या मिटिंगविषयी सांगत असतो. आणि इतिहासाची पुनरावृत्ती घडू लागते.
कालच्या चर्चेतील घटना मी सकारात्मक मांडून सांगत असते. माझा सहकारी तीच गोष्ट पूर्ण नकारात्मक दृष्टीकोनातून मांडत जातो. ऐकणारा शेवटी त्यातून काय समज करून घेतो त्याचे त्यालाच माहित !

कुठेतरी आत मला माहित असते. गेली कित्येक वर्षे आयुष्यात घडत गेलेल्या अनेक वाईट घटनांवर पाय देऊन उभे रहाण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला असतो. अप्रिय, भीषण, अटळ घटना. ह्या घटना 'कालिया' होत्या...परंतु, मी कृष्ण नव्हते. माझ्या पायांत तितके बळ नव्हते. सहजगत्या मर्दन करणे मला शक्य झालेले नसते. हे 'कालियामर्दन' माझ्या आयुष्याची घट करूनच गेलेले असते.
आणि तरीही मी माझा प्रयत्न चालूच ठेवते.
कारण मला हार मानता येत नाही.
मला नकारघंटा वाजवता येत नाही.

मात्र थकवा येतो. मानसिक थकवा.

मी काही त्या पाण्याच्या उगमापर्यंत पोचू शकत नाही.

एक प्रश्र्न मात्र राहून राहून मनात येतो. ज्यावेळी अशा माणसांना मुले होतात, त्यावेळी एक 'खंबीर माणूस उभा करण्याची' आयुष्यातील सर्वात कठीण जबाबदारी हे काय अशाच नकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडू पहातात ? मग ह्या अजाण बालकांचे मोठेपणी होते तरी काय ? ते नक्की कसे घडतात ?

अर्थात, मी त्या बाळाची चिंता का करत आहे ?

...नाहक कोणावर तरी मी खेकसते. आणि ह्या 'नकारघंटे'च्या सहवासातील धोका मला जाणवू लागतो.
आणि खरं तर मला माझीच चिंता वाटू लागते.

May be....I need a break.

Wednesday 2 November 2011

दरवाजे पे दिवार !

कॉलेजच्या दिवसांत शरदने ( नवरा माझा !) बऱ्याच सिनेमांची पोस्टर्स चित्रित केली होती. रस्त्यारस्त्यांवर दिसणाऱ्या त्या त्या सिनेमांची लहान साईझची मुद्रित पोस्टर्स तो मिळवत असे व त्यावरून तंतोतंत पोस्टर्स हातोहात बनवत असे. दादरला श्री. गावडे हे प्रख्यात चित्रकार त्या वेळी मोठमोठ्या आकाराची फिल्म पोस्टर्स बनवत असत. अप्रतिम. कसले एकेक रंगांचे फटकारे. काय तो आत्मविश्वास ! नजर खिळून जात असे. त्या काळोख्या स्टुडीयोत तासंतास उभे राहून गावडे रातोरात एकेक पोस्टर्स उडवत असत. भला मोठा विनोद खन्ना आणि आकाशात नजर लावावी तर तिथे कुठेतरी शत्रुघ सिन्हा ! अगदी दुसऱ्या दिवशी कधी मिनर्व्हा, कधी नाझ तर कधी मराठा मंदिरवर ही भव्य दिव्य पोस्टर्स झळकत असत. आपल्याकडून दाद मिळवत असत.
ह्या 'बाप' गावड्यांकडे शरद जात असे. कधी त्यांना हातभार लावत असे. त्याच्या आयुष्यात मी शिरकाव केल्यानंतर तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे मीही त्याच्या मागे मागे फिरत असे. :) त्यामुळे मीही मग गावड्यांच्या स्टुडिओत शरदबरोबर जाऊन बसू लागले. अर्थात ज्याच्या हाती जन्मजातच देवाची देणगी आहे त्याने तिथे जाऊन बसणे वेगळे व मी त्याच्या बाजूला उभे रहाणे वेगळे. मात्र त्या पोस्टर्समधील काय बघावे व ते कसे बघावे हे तो न कंटाळता मला शिकवत असे. व मी ते मन लावून ऐकत असे. कधी कधी तो मलाही लहान साईझची पोस्टर्स आणून देत असे. मी प्रयत्न करत असे, ती हुबेहूब कागदावर उतरवण्याचा. त्याला दाखवली तर कधी एखादा कौतुकाचा शब्द कानी पडत असे व बऱ्याचदा अख्खा दिवस ओरडा खावा लागत असे. प्रेमकथा म्हणजे नेहेमीच काही गुलाबांच्या पाकळ्यांवर हातात हात घेऊन अलगद फिरणे नसते. हो ना ? ह्या त्याच्या ओरड्याने मी केवळ त्याच्या एखाद्या कौतुकाच्या शब्दासाठी मान मोडून काम करत असे. परंतु, चित्रकला काही शिकवून येत नाही...ती देवाची देणगी असते. देवाने ती माझ्या शरदला दिली होती. (सक्काळी सक्काळी रडण्याचा माझा बेत आहे बहुतेक ! तुम्हीं माझ्याकडे दुर्लक्ष करा...इथे शरदने काढलेले चित्र टाकतेय ते फक्त बघा...आणि कौतुक करा बघू माझ्या नवऱ्याचं ! :)
'दिवार' सिनेमाच्या पोस्टरमधील अमिताभ बच्चनची ती प्रख्यात ढब. लहान आकारावरून स्कॅन करून मोठ्ठा प्रिंट मारला आहे. त्याला मागून गमिंग करून आमच्या दरवाजाला डकवला आहे...अमिताभ बच्चन आणि शरद निगवेकर ! 
दरवाजाला हे जसे लावलेय त्यातही आयडीयेची कल्पना आहे बरं का....त्याच्या डाव्या हाताखाली जे 'पीप होल' आहे ते म्हणजे जणू काही अमिताभच्या हातावरील बिल्ल्यामुळे...त्या सुप्रसिद्ध ढालीमुळे...चुकलेल्या गोळीने पडलेले एक छिद्र आहे ! (मी पोस्टर चिकटवल्यावर माझ्या लेकीने चालवलेलं डोकं आहे हे ! :) )

और मेरे पास क्या हैं ?
...हा हा...हैं...मेरे पास माँ भी हैं ! 
 (आवरा !) :)








कॉलेजच्या दिवसात निसर्गचित्र काढत असताना...


 इजिप्तमध्ये निसर्गचित्र काढत असताना....

 अमेरिकेत व्हाइट हाऊस समोर बसून स्केचिंग करताना..