नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 28 November 2010

जाणीव

सूर्य, समुद्र आणि आकाश. चालले होते त्यांचे रोजचे मूकनाट्य. सूर्य धीम्या गतीने समुद्राच्या दिशेने सरकत होता. जसा खेळ संपल्यावर रंगमंचावरचा पडदा खाली यावा. आणि पडदा असावा बदलत्या रंगांचा. लाटा किनाऱ्याकडे झेपावत होत्या.

प्रेक्षक सीमा. नजर खिळलेली सूर्यावर. नाही तरी कधी ह्याच्या नजरेला नजर भिडवता येते? सीमाची विचारशृंखला सुरु झाली. मऊ वाळूत पाय खुपसून.

जी काही आहे ती मी अशीच कशी घडले? मला कोणी असे घडवले? कोणी मला साथ दिली? निर्मळ मनाने, निस्वार्थी विचाराने? कोणी शिकवले हे आयुष्याचे कुटील धडे?
आभाळात वीज कडाडते, आभाळ फाटतं, एका पळात पुन्हा जुळून येतं. ती वीज काय बदलून जाते त्या आभाळाच्या आयुष्यात? किनाऱ्यावर सरसर लाट येते. परतीच्या रस्त्यावर वाळू खेचून नेते. काय बदलते ती लाट किनाऱ्याच्या आयुष्यात? ना आभाळ नाहीसं होत. ना किनारा आटत. त्या विजेचं आणि त्या नभाचं नातं तर घट्टच. तो किनारा आणि ती लाट मैत्रीचीच तर गाज ऐकवतात. पण ही तर जाणून घ्यायची गोष्ट. कोणी नकळत केलेल्या उपकाराची जाण.
माझ्यावर हे कोणाचं कर्ज? कोण हे माझे सोबती? माझे गुरु?
हो. माझे गुरू...माझी दुःख. माझी काळजी घेणारी दुःख. कणखर बनवून जाणारी ती ही दुःख. येतात. कधी सांगून. तर कधी वावटळीसारखी. साधा दरवाजा देखील वाजवता. कधी वस्तीलाच येतात. पूर्ण पाहुणचार करूनच जातात. तर कधी उभ्या उभ्याच निघून जातात. पण येतात मात्र नक्की.
आता आकळतं. कधी नाही टाकलं त्यांनी एकटं. एकांतात देखील संवाद साधला. कधी एकत्र घेरलं. असंख्य संखेने. कधी अंधारलेल्या रात्री, आपण किती एकटे असा एक क्षण अविचार करावा आणि तलम दुलईत बाजूला बघावं तर हसून हात थोपटतात ती हीच. दुःख. सांगा कोण हल्ली अशी साथ देतं? सुखाच्याही आधी ह्या दु:खांचे आभार. आज जे आहे ते त्यांनी घडवले.
आणि असं कधी कोण विसरतं आपल्या उपकारदात्याला? कोणी आपल्यासाठी एव्हढं करतं. आणि त्यांचाच तिरस्कार करावा? ते लाटांचे थैमान, ते सौदामिनीचे आघात...त्यांची तर मी ऋणी. तुम्हीं तर मला घडवले. खंबीर बनवले. कणखर केले. ताठ मानेने जगायला शिकवले.
आता मग तुम्हीं सांगा...माझ्या दु:खांनो, होऊ कशी मी उतराई?

पडदा पूर्ण पडला. दिवसाचा एक अंक संपला. काळोख घेरू लागला. सीमाचा फोन वाजू लागला. विचार तुटले. जसा एखादा धबधबा अकस्मात लुप्त व्हावा. तिने फोन कानाला लावला.
"हो. आले."
सीमा उठली. घराच्या दिशेने चालू लागली. हातात आजच मिळालेलं बढतीचं पत्र होतं. आणि घरी दारू पिऊन नवरा मोरीत पडला होता. नेहेमीचंच असलं तरी बारा वर्षांचा लेक घाबरला होता. बाबाला उचलायला त्याला आईचे हात हवे होते.

18 comments:

सौरभ said...

हा पोस्ट मला खुप जवळचा वाटतोय. अगदी माझेच विचार उतरवल्यासारखे. कसं ना... दोनजण एकसारखेच विचार करतात. मला खुपच भावला हा पोस्ट. ३रा परिच्छेद तर कमालचा उतरवलाय.
very positively written... very brilliant... :)
अप्रतिम... निव्वळ अप्रतिम...

Anagha said...

आभार आभार सौरभ!!! :)

Deepak Parulekar said...

मस्तच!!
अगदी मनाला भावली हि पोस्ट !
हे बाळंही छान बरं !!

Raindrop said...

:( seema chya dukhhala aahe ka seema ke kadhi na sampanara ek debt aahe je ti carry karatey???

THEPROPHET said...

मला तर सुचतच नाहीये काय लिहू कॉमेंटमध्ये?
झकास, जबरा, मस्त... छ्या कधीकधी शब्द कमी पडतात ना! :)

Soumitra said...

Man gaye ustad , apratim shabd kadhi kadhi mansala nishabd karta, thanks for such wonderful write up keep writing anagha

Anagha said...

धन्यवाद दीपक! :)

Anagha said...

वंदू, सीमाने यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केलेली दिसतेय... :)

Anagha said...

:) विद्याधर, आभार.

Anagha said...

सौमित्र, लिखाण सुधारत नेण्याचा प्रयत्न आहे. आभार रे. :)

BinaryBandya™ said...

अप्रतिम ...

Anagha said...

आभार, बायनरी बंड्या. :)

हेरंब said...

झक्कास, जाम सही !! वेगळंच आहे हे..

बाबा + १

Anagha said...

आभार हेरंब. :)

हेरंब said...

अग काय हे? दोन दिवस होऊन गेले पण तुझी पोस्ट नाही अजून. रोज सकाळी तुझी पोस्ट वाचायची सवय लागलीये आता.. सब सारू छे?

Anagha said...

हेरंब, टाकली रे बाबा आज! :)

संकेत आपटे said...

मस्त मस्त मस्त

Anagha said...

संकेत, आभार. :)